नागरिकांनी मांडली मुख्यमंत्र्यांसमोर गाऱ्हाणी
By admin | Published: August 22, 2015 03:02 AM2015-08-22T03:02:38+5:302015-08-22T03:02:38+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात असले की ते सामान्य नागरिकांना हमखास भेटतात आणि त्यांच्या गाऱ्हाणी ऐकून घेतात.
हैदराबाद हाऊस : तीन तासात हजार निवेदने
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात असले की ते सामान्य नागरिकांना हमखास भेटतात आणि त्यांच्या गाऱ्हाणी ऐकून घेतात. रविवारचा दिवस त्यांनी खास नागरिकांसाठी राखून ठेवला आहे. परंतु शुक्रवारी ते नागपूर दौऱ्यावर असतांना देखील त्यांनी नागरिकांच्या भेटी घेत निवेदने स्वीकारली. हैदराबाद हाऊस येथे लोकांनी मुख्यमंत्र्यांसमोर आपली गाऱ्हाणी मांडली. मुख्यमंत्र्यांनी तीन तासात हजारावर निवेदने स्वीकारली.
विविध विकास प्रकल्पांच्या संदर्भातील प्रश्नांसोबतच पुनर्वसन, पावरलूम उद्योगाशी संबंधित विणकरांनी या उद्योगाला मदत करावी, विविध शाळेतील शिक्षकांचे प्रश्न, अपंगांनी आपल्या मागण्या सोडविण्यासोबतच चार चाकी गाडीच्या मागणीसाठी, मालकी हक्काचे पट्टे, कळमेश्वर येथील नागरिकांनी गावाला रस्ता बांधण्यासाठी, बंद पडलेल्या महामंडळातील कर्मचाऱ्यांना वेतन व पेन्शन मिळण्यासाठी, जीवनदायी आरोग्य योजने संदर्भात तसेच हृदयरुग्णांच्या मदतीसाठी ग्रामीण भागाचे महिलांच्या बचत गटासंदर्भातील तर गडचिरोली येथे औद्योगिक क्षेत्रात उद्योगासाठी भूखंड, धनगर, हलबा, कोष्टी आदी समाजाच्या प्रश्नांसदर्भात अशा विविध मागण्यांची निवेदने मुख्यमंत्र्यांना व्यक्तीश: भेटून देण्यात आली. अंगणवाड्यांमध्ये पौष्टिक आहार पुरविण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली जाते ती एक वर्षाची करावी यासाठी मोठ्या प्रमाणात महिलांनी भेटून आपले निवेदन सादर केले.
घरातील परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मुलाचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मुलासह एक महिला मुख्यमंत्र्यांना भेटली असता शिक्षण पूर्ण करण्यासाठी सवलत असल्याचे सांगून मुलांना शिकवून मोठे करा, आवश्यक मदत देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. नोकरीसाठी आलेल्या नागरिकांना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात वस्तुस्थिती सांगितली पण त्यासोबतच मदत करण्याबाबत आश्वस्तही केले. निवेदन देण्यासाठी आलेल्या शेवटच्या नागरिकांचे निवेदन स्वीकारल्यानंतरच दुसऱ्या महत्त्वाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री रवाना झाले.(प्रतिनिधी)
‘जलयुक्त शिवार’साठी पाच हजाराचा धनादेश
हैदराबाद हाऊस येथे जनतेची निवेदने स्वीकारत असताना मानकापूर येथील हिना कैसर खान तसेच रिट्स ओरा या दोन मैत्रिणींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जलयुक्त शिवार अभियानाला मदत करण्याच्या आवाहनानुसार पाच हजार रुपयाचा धनादेश मुख्यमंत्र्यांना सादर केला. यावेळी सय्यद अमजद अली हे सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित होते.