नागरिकांची कोरोना चाचणीसाठी भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:09 AM2021-04-09T04:09:38+5:302021-04-09T04:09:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : हनुमाननगर झोन कार्यालयात मागील काही महिन्यांपासून सुरूअसलेले कोविड चाचणी केंद्र मागील पाच दिवसांपासून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हनुमाननगर झोन कार्यालयात मागील काही महिन्यांपासून सुरूअसलेले कोविड चाचणी केंद्र मागील पाच दिवसांपासून अचानक बंद करण्यात आले आहे. या झोनध्ये दुसरे चाचणी केंद्र नसल्याने चाचणीसाठी येणरे संशयित झोन कार्यालयातून परत जातात. जवळपास चाचणी केंद्र नसल्याने तपासणी न करता संशयित भटकंती करतात. यामुळे संक्रमणाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
झोन कार्यालय परिसरात फिरते चाचणी केंद्र सुरू होते. यामुळे परिसरातील नागरिकांची सुविधा झाली होती. परिसर मोठा असल्याने दैनंदिन कामकाजावर याचा कोणताही परिणाम झाला नव्हता; परंतु शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मागील शनिवारपासून हे केंद्र अचानक बंद करण्यात आले.
कोविड चाचणी केंद्र बंद केल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. लक्षणे असूनही परिसरात केंद्र नसल्याने अनेकजण कोरोना चाचणी करण्याचे टाळतात. यामुळे संक्रमणाचा धोका निर्माण झाला आहे.
केंद्र बंद करून महापालिका प्रशासनाने काय साध्य केले, असा सवाल नगरसेवक सतीश होले यांनी केला आहे. केंद्र बंद केल्याचे प्रशासनाने जाहीर न केल्याने तपासणीसाठी येणाऱ्या नागरिकांना परत जावे लागत आहे. शहरात संक्रमण वाढत असताना केंद्र बंद करण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.