ग्रामीण भागातील नागरिकांनी उपाययाेजनांचे पालन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:11 AM2021-02-26T04:11:21+5:302021-02-26T04:11:21+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क हिंगणा : दुसऱ्या टप्प्यातील काेराेना संक्रमण लक्षात घेता शहरांसह ग्रामीण भागातील काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे काटेकार पालन ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
हिंगणा : दुसऱ्या टप्प्यातील काेराेना संक्रमण लक्षात घेता शहरांसह ग्रामीण भागातील काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे काटेकार पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी हिंगणा तहसील कार्यालयाच्या सभागृहातील आढावा बैठकीत केले. काेराेना संक्रमण विचारात घेता २५ फेब्रुवारीपासून ७ मार्चपर्यंत कठाेर निर्बंध लावण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
या काळात शहरी व ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये, आठवडी बाजार, मंगल कार्यालये, सभागृह बंद राहणार आहेत. शनिवार व रविवारी संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे. यात केवळ वैद्यकीय सेवांना मुभा देण्यात आली आहे. लग्न समारंभांना ब्रेक लावण्यासाठी मंगल कार्यालयांनाही परवानगी नाकारण्यात आली आहे. कुणालाही या काळात सभा, मिरवणूक, आंदोलने करता येणार नाहीत, असेही जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी स्पष्ट केले.
आरोग्य विभागाने कोरोना चाचण्या वाढवाव्यात. काेराेना संक्रमित रुग्णांच्या ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’वर अधिक भर द्यावा, असे निर्देश त्यांनी तालुका आरोग्य विभागाला दिले. हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये क्षमतेपेक्षा ५० टक्के कमी क्षमतेने ग्राहकांना परवानगी देण्यात आली आहे. क्षमतेपेक्षा जास्त ग्राहक आढळून आल्यास संबंधितांवर तसेच मास्क न वापरणाऱ्यांसह फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक तसेच प्रसंगी फाैजदारी कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी पोलीस विभागाला दिल्या.
कोरोनाची दुसरी लाट थांबवण्यासाठी जनतेने नियमितपणे मास्क वापरावे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, गर्दीमध्ये जाण्याचे टाळावे, यासह इतर नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले. यावेळी त्यांनी काेराेना संदर्भातील उपाययाेजनांचा आढावा घेतला. या बैठकीला उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी, तहसीलदार संतोष खांडरे, नायब तहसीलदार ज्योती भोसले, महादेव दराडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पडवे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रविकांत घोडेराव, नगर पंचायतचे मुख्याधिकारी राहुल परिहार, ठाणेदार सारिन दुर्गे यांच्यासह महसूल, आरोग्य, पंचायत, एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.