नागरिकांनी रोखले त्रिमूर्तीनगरातील सिमेंट रोडचे काम, भाजयुमो पदाधिकारीदेखील उतरले रस्त्यावर
By योगेश पांडे | Published: August 6, 2024 05:35 PM2024-08-06T17:35:58+5:302024-08-06T17:39:03+5:30
Nagpur : कंत्राटदारांकडून करण्यात येणाऱ्या हलगर्जीपणामुळे नागरिकांमध्ये असंतोष
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत जागोजागी सिमेंट मार्गांचे काम सुरू असून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडूनच यासाठी पुढाकार घेण्यात आला होता. मात्र अनेक ठिकाणी सिमेंट मार्गांच्या कामातील संथपणा व कंत्राटदारांकडून करण्यात येणारी हलगर्जी यामुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे. मंगळवारी त्रिमूर्तीनगर परिसरात नागरिक या थंड कारभाराविरोधात रस्त्यावर उतरले व काम बंद पाडले. आश्चर्याची बाब म्हणजे या नागरिकांमध्ये भाजपा व भाजयुमोचे कार्यकर्ते व पदाधिकारीदेखील होते. एकीकडे नेत्यांकडून सिमेंट मार्ग बांधण्याचा सपाटा लावण्यात येत असताना कार्यकर्त्यांकडूनच विरोध झाल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.
शहरात अनेक ठिकाणी सिमेंट रस्त्यांचे काम सुरू आहे. विशेषत: दक्षिण-पश्चिम नागपुरात रिंग रोड ते ऑरेंज स्ट्रीटकडे जाणाऱ्या चार ते पाच मोठ्या मार्गांवर सिमेंट रस्त्यांचा काम सुरू आहे. मात्र हे काम अतिशय संथ गतीने होत आहे. अर्धा रस्ता तयार झाल्यावर एक बाजू उंच झाली आहे. मात्र कंत्राटदाराने तेथे बॅरिकेट्स लावलेलेच नाही. त्यामुळे त्रिमूर्तीनगर चौकाकडून ऑरेंज स्ट्रीटकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक अपघात झाले आहेत. वाहने सिमेंट रस्त्याच्या खाली उतरून लोक पडत आहे. विशेषत: महिला व ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत आहे. याविरोधात तक्रारी करूनदेखील नासुप्रचे अधिकारी व कंत्राटदार यांनी काहीच पावले उचलली नव्हती. अखेर नागरिकच रस्त्यावर उतरले व काम बंद पाडले. नासुप्रचे अधिकारी व कंत्राटदार पोहोचल्यावर त्यांनी बॅरिकेडिंग करण्याचे आश्वासन दिले. तेव्हा आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलन करणाऱ्यांमध्ये भाजयुमोचे प्रदेश सचिव देवा डेहनकर व इतर भाजप कार्यकर्तेदेखील होते. सिमेंट मार्गांतील कंत्राटदारांच्या हलगर्जीमुळे त्यांच्यातदेखील नाराजी असल्याची बाब समोर आली आहे.
एप्रिल महिन्यापासून पेव्हर ब्लॉकच नाही
भेंडे ले आऊट चौक ते रिंग रोड या मार्गावर सहा महिन्यांअगोदर सिमेंट मार्गाचे काम सुरू करण्यात आले होते. एप्रिल महिन्यात सिमेंट मार्ग तयारदेखील झाला. मात्र त्यानंतर कंत्राटदाराने रस्त्याच्या कडेला व इतर आवश्यक ठिकाणी पेव्हर ब्लॉक्सच लावलेले नाहीत. शिवाय रस्त्याच्या शेजारी असलेल्या नाल्यादेखील अर्धवटच टाकून दिल्या असून त्यातील सळाखींमुळे थेट जीव जाण्याचाच धोका आहे. वारंवार तक्रारी करूनदेखील अधिकारी व कंत्राटदाराने काम सुरू करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सिमेंट मार्ग बनवलाच का अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उपस्थित होत आहे.