नागपुरातील ट्रस्ट ले- आऊचे नागरिक रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 08:42 PM2020-05-23T20:42:36+5:302020-05-23T20:45:33+5:30
धरमपेठ झोन अंतर्गत येणाऱ्या प्रभाग १३ मधील ट्रस्ट ले- आऊट,अंबाझरी परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने हा परिसर २२ मे पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून सील करण्यात आला होता. या परिसरातील क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांचे रिपोर्टही निगेटिव्ह आले असतानाही या परिसरातील निर्बंध का हटवण्यात आले नाहीत, असा सवाल करीत संतप्त नागिरक शनिवारी रस्त्यावर आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धरमपेठ झोन अंतर्गत येणाऱ्या प्रभाग १३ मधील ट्रस्ट ले- आऊट,अंबाझरी परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने हा परिसर २२ मे पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून सील करण्यात आला होता. या परिसरातील क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांचे रिपोर्टही निगेटिव्ह आले असतानाही या परिसरातील निर्बंध का हटवण्यात आले नाहीत, असा सवाल करीत संतप्त नागिरक शनिवारी रस्त्यावर आले. दुपारी १२ च्या सुमारास हिल टॉप परिसरात संतप्त नागरिकांनी एकत्र येऊन मनपा प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून प्रतिबंध हटवण्याची मागणी केली.
परिसरातील नागरिकांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांना या घटनेची फोनद्वारे माहिती दिली. माहिती मिळताच विकास ठाकरे घटनास्थळी पोहचले. त्यांनी नागरिकांची समजूत काढली. पोलीस व महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांनी सायंकाळी ४ नंतर निर्बंध हटविण्यात येईल. अशी स्पीकरवरून घोषणा केली. मात्र रात्रीपर्यंत मनपा प्रशासनाकडून निर्बंध हटविण्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नव्हती. यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती अजूनही कायम आहे.
ट्रस्ट ले- आऊट,अंबाझरी पसिरात दुधाचा व्यवसाय करणारे आहेत. परंतु निर्बंधामुळे मागील दोन आठवड्यापासून त्यांना जनावरांना चारा घालणे कठीण झाले आहे. परिसरातील ऑटोचालक, भाजी विक्रेते, मोलमजुरी करणारे घरातच बसून असल्याने त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. वास्तविक प्रतिबंधित क्षेत्र घोषित केलेल्या परिसरातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू राहील याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे. परंतु मागील १५ दिवसात या भागातील नागरिकांना प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत झाली नसल्याने रस्त्यांवर यावे लागले.
हाताला काम नाही. घरातील अन्नधान्य संपले, बाहेरची कुठली मदत नाही.यामुळे नागरिकात प्रचंड रोष निर्माण झाला. या परिसरात बाधित रुग्ण नव्हता तर तो किडनीचा रुग्ण होता असे परिसरातील नागरिकांनी सांगितले. प्रतिबंध न हटविल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.
प्रशासनाने नागरिकांना वेठीस धरू नये
बाधित रुग्ण आढळून आल्याने २२ मे पर्यंत ट्रस्ट ले- आऊट,अंबाझरी परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला होता. या परिसरात दुधाचा व्यवसाय करणारे, आॅटोचालक, भाजी विक्रेते, मोलमजुरी करणारे नागरिक मोठ्या संख्येने आहेत. त्यात मनपा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत नाही. १५ दिवसापासून घरातच असल्याने या लोकापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. परिसरातील नागरिकाचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने येथील निर्बंध हटविण्यासंदर्भात शुक्रवारीच नागरिकांचे फोन आले. २२ तारीख संपल्याने नागरिकांचा संयम सुटला व शेकडो नागरिक रस्त्यावर आले. नागरिकांना वेठीस न धरता मनपा प्रशासनाने प्रतिबंध हटवावे, अन्यथा निर्माण होणाºया परिस्थितीला प्रशासन जबाबदार राहील, अशी भूमिका विकास ठाकरे यांनी मांडली. यापूर्वीही के.टी. नगरच्या क्वॉरनटाईन सेंटरवरून मुंडे-ठाकरे यांच्यात अदृष्य संघर्ष झाला होता.