सांडपाण्याच्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:12 AM2021-06-16T04:12:05+5:302021-06-16T04:12:05+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल : शहरातील राऊतपुरा भागात भूमिगत नाल्यांचे बांधकाम अपूर्ण आहे. त्यातच या नाल्यांमधील सांडपाण्याची दुर्गंधी सुटल्याने ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल : शहरातील राऊतपुरा भागात भूमिगत नाल्यांचे बांधकाम अपूर्ण आहे. त्यातच या नाल्यांमधील सांडपाण्याची दुर्गंधी सुटल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या प्रकारामुळे कीटकजन्य आजारांना निमंत्रण मिळत असल्याने पावसाळ्यात या भागातील नागरिकांचे आराेग्य धाेक्यात येण्याची शक्यता बळावली आहे.
स्थानिक नगरपरिषद प्रशासनाने राऊतपुरा भागात भूमिगत नाल्यांचे काम हाती घेतले आहे. काही भागातील नाल्यांचे काम पूर्णत्वास नेण्यात आले असून, काही भागातील नाल्या रखडल्या आहेत. यात शहरातील कुणबीपुरा ते काळे चौक दरम्यान भूमिगत नाल्या तयार करण्यात आल्या;मात्र यातून अनिल पांडे ते आशा राऊत यांच्या घरापर्यंतच्या नालीचे बांधकाम वगळण्यात आले. त्यामुळे त्यांच्या घरासमाेर सांडपाणी साचत असून, त्याची दुर्गंधी सुटली आहे.
एवढेच नव्हे तर, डासांची पैदास वाढल्याने डेंग्यू, मलेेरिया व तत्सम आजार हाेण्याची शक्यता बळावली आहे. ही समस्या साेडविण्यासाठी स्थानिक नगरपालिका प्रशासनाला अनेकदा विनंती केली; मात्र कुणीही लक्ष दिले नाही, असा आराेपही या भागातील नागरिकांनी केला आहे. येथील नागरिकांसह मुलांचे आराेग्य लक्षात घेता या नाल्यांचे तातडीने बांधकाम करावे, अशी मागणी चंद्रशेखर निंबाळकर, आशा राऊत, अरुणा बरडे, प्रभाकर ढोक, विमल गुढधे, अनिल पांडे यांच्यासह नागरिकांनी केली आहे.