अपूर्ण सिमेंट रस्त्यामुळे नागरिक झाले त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 04:13 AM2020-11-28T04:13:44+5:302020-11-28T04:13:44+5:30
वंजारीनगर सिमेंट रोड : लॉकडाऊनच्या आधीपासून आहे काम सुरू नागपूर : वंजारीनगर मार्गावर सायंकाळी दररोज वाहतुकीचा खोळंबा होतो. त्यामुळे ...
वंजारीनगर सिमेंट रोड : लॉकडाऊनच्या आधीपासून आहे काम सुरू
नागपूर : वंजारीनगर मार्गावर सायंकाळी दररोज वाहतुकीचा खोळंबा होतो. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. याचे मुख्य कारण वंजारीनगर मार्गावरील अपूर्ण सिमेंट रोड आहे. वंजारीनगर पाण्याच्या टाकीपासून कॅन्सर रुग्णालयापर्यंत रस्त्याच्या एका बाजूचे सिमेंट रस्त्याचे काम अपूर्ण आहे. प्रशासनाने या मार्गावर सिमेंटीकरणाचे काम लॉकडाऊन सुरू होण्याच्या आधीपासून सुरू केले आहे. परंतु अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही. यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनुसार हे काम कासवगतीने सुरू असल्यामुळे त्यांना त्रास होत आहे.
वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांना मनस्ताप
सिमेंट रस्त्याचे काम अपूर्ण असल्यामुळे वंजारीनगर मार्गावर एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. अशा स्थितीत वाहन चालकांना त्रास होत आहे. सायंकाळी शासकीय कार्यालयात सुटी झाल्यानंतर येथे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. अशा स्थितीत वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक महिन्यांपासून हे सुरु असून काम पूर्ण न झाल्यामुळे या मार्गावरून वाहन चालविणे कठीण झाल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.
अपघाताची शक्यता
रस्त्याच्या एका बाजूला सिमेंटीकरणाचे काम अपूर्ण आहे. हा रस्ता उंच करून तयार करण्यात येत आहे. त्यामुळे दुसरीकडील रस्ता खोलगट झाला आहे. वाहन चालविताना रस्त्याला धडक बसण्याची शक्यता असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
सामग्री पसरली, रस्त्यावर गिट्टीचे ढीग
वंजारीनगर रस्त्याच्या सिमेंटीकरणाबाबत प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे. कामाचा वेग सुरुवातीपासूनच मंद आहे. या कामात बेजबाबदारपणा दिसून येत आहे. वंजारीनगर मार्गावर गिट्टीचे ढीग पसरले आहेत. यामुळे वाहन चालविताना त्रास होत आहे. अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्ता तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी सामग्री पसरली आहे. परंतु ही सामग्री व्यवस्थित करण्यासाठी लक्ष दिले जात नाही.
रुग्णालयात भरती होणे कठीण
पाण्याच्या टाकीपासून कॅन्सर रुग्णालय चौकापर्यंतचे सिमेंटीकरण अपूर्ण आहे. ज्या भागाकडे काम अपूर्ण आहे तेथे रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. त्याच बाजूला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि कॅन्सर हॉस्पिटल आहे. परंतु रस्ता बंद असल्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना तसेच डॉक्टरांनाही रुग्णालयात जाणे कठीण झाले आहे. अनेकदा रुग्णांना रुग्णालयात नेताना नातेवाईकांच्या नाकी नऊ येतात.
चौकही समतल नाहीत
रस्त्याच्या एका बाजूला सिमेंटीकरणाचे काम अपूर्ण असून चौकही समतल न करताच तसेच सोडून देण्यात आले आहेत. यामुळे वाहनचालकांना सांभाळून वाहन चालवावे लागत आहे. चौक रस्त्याच्या समतल नसल्यामुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. हे चौक आधीच समतल करायला हवे होते, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
फुटपाथ अपूर्ण,
सिमेंटीकरणाला लागून काही भागात गट्टु लावण्यात येतो. परंतु हे कामही अपूर्ण आहे. आतापर्यंत अनेक ठिकाणी गट्टु लावण्यात आले नाहीत. दोन्ही बाजूने फुटपाथ खोदून काम अपूर्ण सोडण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालण्याची वेळ येत आहे.
निधीमुळे काम रखडले
‘वंजारीनगर सिमेंटीकरणाचा कालावधी संपला आहे. लॉकडाऊनच्या पूर्वीच काम पूर्ण करावयाचे होते. कंत्राटदाराला पैसे न दिल्यामुळे लॉकडाऊनमध्ये काम बंद होते. निधीचा तुटवडा असल्यामुळे काम रखडले. आता एका महिन्यापूर्वी काम सुरु झाले आहे. काम त्वरित पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. परंतु अद्यापही कामाची गती मंदच आहे.’
-विजय चुटेले, नगरसेवक
..................