उमरेडच्या गजानन नगरीत नागरिकच झाले पाहरेकरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:18 AM2021-09-02T04:18:50+5:302021-09-02T04:18:50+5:30
उमरेड : मागील दोन आठवड्यापासून स्थानिक गजानन नगरी येथे भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. चोरट्यांच्या या त्रासामुळे परिसरातील नागरिकांनी ...
उमरेड : मागील दोन आठवड्यापासून स्थानिक गजानन नगरी येथे भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. चोरट्यांच्या या त्रासामुळे परिसरातील नागरिकांनी दरदिवशी वेगवेगळी चमू तयार केली असून, रात्रीपासून ते पहाटेपर्यंत ‘जागते रहो’ म्हणत स्वत:च पहारेकरी बनले आहेत.
उमरेड तालुक्यातील ग्रामपंचायत नवेगाव साधूअंतर्गत गजानन नगरीचा अंतर्भाव होतो. उमरेड शहरात सुमारे ३५ घरांची ही नवीन वस्ती आहे. मागील अनेक वर्षांपासून या परिसराचा नगरपालिकेत अंतर्भाव करण्यात यावा, अशी मागणी आहे. ग्रामपंचायत स्थानिकांचे प्रश्न-समस्यांकडे दुर्लक्ष करीत असून, विद्युत समस्येमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या परिसरात विद्युत खांब उभारण्यात आले आहेत. खांब असले तरी विद्युत तार उपलब्ध नसल्याने पथदिव्यांची सुविधाच अद्याप झाली नाही. यामुळे सायंकाळ होताच परिसरात सर्वत्र अंधार पसरतो.
महिला-तरुणी आणि लहान मुलांमध्ये भीती या परिसरात असून साप, विंचू यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. काही नागरिकांनी स्वखर्चातून पथदिवे लावत कशीबशी सुविधा केली आहे. अनेकदा ग्रामपंचायतीकडे याबाबत निवेदने सोपविली. चर्चा केली. अद्याप समस्याच न सुटल्याने परिसरातील नागरिकांमध्ये संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.
--
दहा जणांची चमू
परिसरात पथदिवेच नसल्याने आणि अंधार पसरल्याने ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली असतात. याचाच फायदा घेत चोरट्यांचा नेहमीच त्रास होतो. या कारणामुळे दररोज दहा जणांची चमू रात्र जागत पहारा देत आहेत. आम्ही उमरेड शहरात वास्तव्याला असतानाही आमचा भाग ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या नवेगाव साधू ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. यामुळे परिसरात अन्य नवीन वस्तीप्रमाणे विकास कामे झाली नाही, असाही आरोप येथील नागरिकांचा आहे.