मृतदेहासह वाठोडा येथील नागरिक मनपा कार्यालयावर धडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:08 AM2021-02-10T04:08:42+5:302021-02-10T04:08:42+5:30
रात्री उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन : महापौरांनी अतिक्रमण हटविण्याचा आदेश दिल्याने हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा आरोप लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर: वाठोडा ...
रात्री उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन : महापौरांनी अतिक्रमण हटविण्याचा आदेश दिल्याने हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: वाठोडा येथील रहिवासी गिरीश वर्मा (५०) यांचा मंगळवारी सकाळी हृदयविकाराने मृत्यू झाला.
पूर्व नागपुरातील वाठोडा व तरोडी येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या(साई)क्षेत्रीय केंद्रासाठी आरक्षित जागेवर वर्मा यांनी घराचे बांधकाम सुरू केले होते. या जागेवरील अतिक्रमणधारकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापौर दयाशंकर तिवारी यांनी सोमवारी एका बैठकीत दिले. याबाबतच्या वृत्तामुळे वर्मा यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत या परिसरातील नागरिकांनी त्यांच्या मृृतदेहासह महापालिका मुख्यालयावर मंगळवारी दुपारी धडक दिली. रात्री ८ पर्यंत आंदोलक ठाण मांडून होते. महापौर व मनपा प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत होते. त्यानंतर सदर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. तर वर्मा यांचा मृतदेह तपासणीसाठी मेडिकल रुग्णालयात पाठविला.
जिल्हा परिषदेच्या सदस्य अवंतिका लेकुरवाळे व नाना कंभाले यांच्या नेतृत्वातील आंदोलकांनी महापौर व मनपा प्रशासनाच्या विरोधात नागरिकांनी जोरदार नारेबाजी केली. गिरीश वर्मा यांनी १२ वर्षांपूर्वी रजिस्ट्री करून प्लॉटची खरेदी केली होती केली. त्यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. बांधकामावर पाणी मारत असताना पेपरमधील गुन्हे दाखल करण्याचे वृत्त वाचले. याचा त्यांना धक्का बसला असा आरोप गिरीश वर्मा यांचे सुपुत्र प्रतीक वर्मा व आंदोलकांनी यावेळी केला
साईच्या क्षेत्रीय केंद्राची स्थापना पूर्व नागपुरातील वाठोडा भागात करण्याचा निर्णय चार वर्षापूर्वी केंद्र सरकारने घेतला आहे. यासाठी महापालिकेने तरोडी व वाठोडा येथील १४० एकर जमीन साईला दिली. परंतु यातील ५२ एकर जागेवर घरे असल्याने या जागेचा ताबा मनपाने अद्याप दिलेला नाही. दुसरीकडे या भागात हजारो लोकांनी भूखंड खरेदी केले. यातील काही लोकांनी घराचे बांधकाम केले. येथील नागरिकांचा साईला जागेचा ताबा देण्याला विरोध आहे.