‘शाईफेक’वर कारवाईसाठी शहर काँग्रेसचे ‘चलो दिल्ली’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 01:16 AM2017-09-21T01:16:48+5:302017-09-21T01:17:07+5:30
महापालिका निवडणुकीच्या प्रचारात पूर्व नागपुरातील प्रचार सभेत प्रदेशाध्याक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यावर शाई फेकण्यात आली. पक्षाचे उमेदवार पाडण्यासाठी कट रचण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका निवडणुकीच्या प्रचारात पूर्व नागपुरातील प्रचार सभेत प्रदेशाध्याक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यावर शाई फेकण्यात आली. पक्षाचे उमेदवार पाडण्यासाठी कट रचण्यात आले. नगरसेवकांना पक्षविरोधी भूमिका घेण्यास भाग पाडण्यात आले. यामागे पक्षातील काही नेत्यांचा असून त्यांच्याविरोधात अ.भा. काँग्रेस कमिटी व प्रदेश काँग्रेस कमिटीकडे तक्रार करूनही कारवाई झालेली नाही. त्यामुळे शहर काँग्रेसचे शिष्टमंडळ नवरात्रीनंतर दिल्ली येथे धडक देऊन अ.भा. काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयासमोर शंखनाद करण्याचा व बैठा सत्याग्राह करणार आहे.
काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी देवडिया भवनात नागपूर शहर कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत पदाधिकाºयांनी पक्षविरोधी कारवाया करणाºयांवर कारवाई करण्यात होत असलेल्या विलंबावर नाराजी व्यक्त केली. पक्षातील काही नेते भाजपाशी हातमिळवणी करून शहरात पक्ष कमजोर करू पाहत आहेत. अशा नेत्यांचे पुरावे सादर केल्यानंतरही त्यांच्यावर कारवाई होत नाही. यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांचे मनोबल खचत आहे, असा सूर व्यक्त करण्यात आला. शहर काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने दिल्ली गाठून ज्येष्ठ नेत्यांना पक्षविरोधी कारवायांचे प्रकार निदर्शनास आणून द्यावे, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
बैठकीत अॅड. अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री, अतुल कोटेचा, बंडोपंत टेंभूर्णे, राजू व्यास, डॉ. गजराज हटेवार, जयंत लुटे, प्रा. दिनेश बानाबाकोडे, अॅड. अक्षय समर्थ, रेखा बाराहाते, धरम पाटील, विलास भालेकर, वीणा बेलगे आदींनीही पक्ष बळकटीसाठी भूमिका मांडली. यावेळी रत्नाकर जयपूरकर, महेश श्रीवास, डॉ. मनोहर तांबुलकर, चंद्रकांत बडगे, नितीश ग्वालबन्सी, विक्रम पनकुले, विवेक निकोसे, वासुदेव ढोके, ईश्वर बरडे, संजय झाडे, संजय सरायकर, अरविंद वानखेडे, किरण गडकरी, हरीश ग्वालबन्सी, पंकज थोरात आदी उपस्थित होते.
काँग्रेस नेते घालताहेत ‘वाड्यावर’ लोटांगण
काँग्रेसचे काही नेते युएलसी घोटाळा, बँक घोटाळा, शिक्षण संस्थामधील गैरप्रकारात अडकले आहेत. आपल्यावर कारवाई होऊ नये म्हणून हे नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ‘वाड्यावर’ लोटांगण घालत आहेत. हे नेते भाजपाच्या इशाºयावर काँग्रेस तोडण्याचे काम करीत आहेत, असा आरोप विकास ठाकरे यांच्यासह पदाधिकाºयांनी बैठकीत केला. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यावर शाई फेकण्याचा कट कुणी रचला, ‘वाड्यावर’ कोण जातो, गडकरींच्या गाडीत कोण फिरतो, कुणाच्या शिक्षण संस्थेला गडकरींच्या खात्याकडून कोट्यवधीचे काम मिळाले आहे, याचे पुरावे, पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे सोपविले जाईल, असेही ठाकरे यांनी या वेळी सांगितले.