शहरातील विद्युत वाहिन्या भूमिगत होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:09 AM2021-09-21T04:09:17+5:302021-09-21T04:09:17+5:30
नागपूर : नागपूर शहरात भूमिगत विद्युत वाहिनीचे जाळे भक्कम करण्यावर यापुढे भर राहणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत ...
नागपूर : नागपूर शहरात भूमिगत विद्युत वाहिनीचे जाळे भक्कम करण्यावर यापुढे भर राहणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले. १३२ के.व्ही. पारडी ते जाटतरोडी द्विपथ भूमिगत विद्युत वाहिनीचे भूमिपूजन सोमवारी जाटतरोडी येथे पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. राऊत म्हणाले, १३२ के.व्ही.चे जाटतरोडी उपकेंद्र कार्यान्वित झाल्यानंतर पारडी, बेसा व उप्पलवाडी येथील उपकेंद्राचा विद्युत भार कमी होणार आहे. जाटतरोडी उपकेंद्रातून ३३ के.व्ही.च्या १२ फिडरचे कामही प्रस्तावित आहे. प्रस्तावित १३२ के.व्ही. जाटतरोडी उपकेंद्र शहराच्या मध्यवर्ती भागात येत असल्यामुळे महावितरणच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे. या उपकेंद्रातून शहरातील पूर्व, मध्य व दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील ग्राहकांना अखंडित व योग्य दाबाने वीज पुरवठा होणार आहे. यामुळे जवळपास ८६ हजार ग्राहकांना फायदा होणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
यावेळी महापारेषण नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता महेंद्रकुमार वाळके, महावितरणचे नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता (प्रकल्प) अविनाश निंबाळकर, अधीक्षक अभियंता (स्थापत्य) अविनाश कसबेकर, अधीक्षक अभियंता (संचालन व सुव्यवस्था) सतीश अणे, अधीक्षक अभियंता (चाचणी) संजय आत्राम उपस्थित होते.