शहरातील नद्या स्वच्छता अभियानाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:07 AM2021-04-12T04:07:11+5:302021-04-12T04:07:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या वतीने नाग नदी, पिवळी व पोहरा नदी स्वच्छता अभियानाला रविवारी सुरुवात करण्यात आली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या वतीने नाग नदी, पिवळी व पोहरा नदी स्वच्छता अभियानाला रविवारी सुरुवात करण्यात आली. नाग नदी स्वच्छतेला अशोक चौक येथे
आमदार प्रवीण दटके व उपमहापौर मनीषा धावडे यांच्या उपस्थित, पिवळी नदी स्वच्छतेला नारा घाट येथे सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे, आरोग्य समितीचे माजी सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. सहकारनगर घाटाजवळ पोहरा नदीवर स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर व माजी आमदार अनिल सोले यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.
यावर्षी नदी स्वच्छता अभियानांतर्गत नद्यांची रुंदी व खोली पूर्णपणे स्वच्छ करून पावसाळी पाणी वाहण्याकरिता सुरळीत प्रवाह करण्यात येईल. सोबतच या तीनही नद्यांच्या काठावर पावसाळ्याच्या सुरुवातीला जास्तीत जास्त झाडे लावण्यासाठी नदी काठावर राहणाऱ्या नागरिकांना झाडे लावण्याकरिता प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. नदी स्वच्छता अभियान राबविण्यासाठी नद्यांचे उपभाग करण्यात आले असून, यामध्ये प्रत्येकी १ उपअभियंता व १ सी.एस.ओ. लावण्यात येणार आहे.
.....
नदीकाठावर वृक्षारोपण करणार
नदी स्वच्छता अभियानासोबतच यावर्षी तीनही नद्यांच्या काठावर वृक्षरोपणाला जून महिन्यात सुरुवात केली जाणार आहे. यामध्ये फळांसह औषधी झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच वृक्षारोपणात नागरिकांचा सहभाग असावा यासाठी स्मृती वृक्ष, ग्रह उद्यान, नक्षत्र उद्यान, वन औषधी, फळ वृक्षारोपण जून महिन्यापासून करण्याच्या सूचना महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिल्या आहेत. तसेच वृक्षांचे पालकत्व देण्यात येईल. नागरिकही वृक्षांचे जतन व संवर्धन करतील. ....
असे राहील स्वच्छता अभियान
नाग नदी
अंबाझरी तलाव ते पंचशील चौक
पंचशील चौक ते अशोक चौक
अशोक चौक ते सेंट जेविअर स्कूल
सेंट जेविअर स्कूल ते पारडी ब्रिज (भंडारा रोड)
पारडी ब्रिज ते पूनापूर (भरतवाडा - नाग व पिवळी नदी संगम)
...
पिवळी नदी
गोरेवाडा तलाव ते मानकापूर दहन घाट
मानकापूर दहन घाट ते कामठी रोड पुलिया
कामठी रोड पुलिया ते जुनी कामठी रोड पुलिया
जुनी कामठी रोड पुलिया ते पूनापूर (भरतवाडा नाग व पिवळी नदी संगम)
...
पोहरा नदी
सहकारनगर ते नरेंद्रनगर पूल
नरेंद्रनगर ते पिपळा फाटा
पिपळा फाटा ते नरसाळा विहीरगाव
....