विदर्भातील सामाजिक संस्थांसाठी हक्काचे व्यासपीठ : ग्रामायण २०१८
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 10:12 PM2018-02-10T22:12:01+5:302018-02-10T22:14:48+5:30
विदर्भात अनेक सामाजिक संस्था वेगवेगळे विषय घेऊन कार्य करतात. यात सेंद्रीय शेतकरी, महिला बचतगट, पर्यावरण पूरक उत्पादने तयार करणाऱ्या संस्था, ग्रामीण कारागीर, स्वच्छतेचे उपक्रम राबविणाऱ्या संस्था आदींचा समावेश आहे. या संस्थांच्या कार्याची माहिती व्हावी या उद्देशाने ग्रामायण समूह आणि धनश्री महिला नागरि पतसंस्थेच्यावतीने देवनगरच्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या परिसरात ग्रामायण २०१८ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भात अनेक सामाजिक संस्था वेगवेगळे विषय घेऊन कार्य करतात. यात सेंद्रीय शेतकरी, महिला बचतगट, पर्यावरण पूरक उत्पादने तयार करणाऱ्या संस्था, ग्रामीण कारागीर, स्वच्छतेचे उपक्रम राबविणाऱ्या संस्था आदींचा समावेश आहे. या संस्थांच्या कार्याची माहिती व्हावी या उद्देशाने ग्रामायण समूह आणि धनश्री महिला नागरि पतसंस्थेच्यावतीने देवनगरच्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या परिसरात ग्रामायण २०१८ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रामायण २०१८ प्रदर्शनाच्या माध्यमातून विदर्भातील सामाजिक संस्थांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. शासनाने मोठमोठ्या कंपन्यांना ‘सीएसआर’ (कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी) फंड विविध संस्थांना देण्याचे बंधन घालून दिलेले आहे. त्यामुळे विदर्भातील गरजू संस्थांना मदत व्हावी या उद्देशाने ग्रामायण समूहातर्फे विविध कार्पोरेट कंपन्यांना प्रदर्शनात पाचारण करण्यात आले आहे. प्रदर्शनात ग्रामीण भागातील संस्थांचे एकुण ९६ स्टॉल्स असून यात नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला आदी जिल्ह्यातील संस्थांचा समावेश आहे.
सक्षमच्या दिव्यांग मुलांच्या कलाकृती
अकोला येथील सक्षम (क्षितिज) या संस्थेतील दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या आकर्षक कलाकृतींचा स्टॉल प्रदर्शनात आहे. संस्था दृष्टिहीन मुलांसाठी १२ वर्षांपासून कार्य करते. संस्थेत २५ मुलामुलींना उच्च शिक्षण देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात येते. मुलांना स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करवून घेण्यात येते. स्वयंरोजगाराकडे वळु इच्छिणाऱ्या मुलांना त्याचे प्रशिक्षण देण्यात येते. मुलांनी प्रदर्शनात वेगवेगळ्या फ्लेव्हरचे केमिकल विरहित नैसर्गिक चॉकलेट, जवस, खोबरा, लसून, तीळ, शेंगदाण्याची चटणी, वेस्ट बे्रल पुस्तकापासून तयार केलेले बुक मार्क्स, गिफ्ट पाकिट, टिपणवही आदी सादर केल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्ष मंजुश्री कुळकर्णी, सचिव गोविंद कुळकर्णी यांनी दिली. संस्थेतर्फे नेत्रदानाचे फॉर्मही भरुन घेण्यात येत आहेत.
सुपारीच्या पानापासून ताट-वाटी
सृष्टी एंटरप्रायजेसच्या स्टॉलवर सुपारीच्या पानापासून तयार केलेले ताट, वाटी, चमचा विक्रीसाठी उपलब्ध आहे. कर्नाटकमध्ये सुपारीची झाडे अधिक असल्यामुळे तेथे याचे उत्पादन होते. हे ताट-वाटी पाच ते पाच वेळा धुऊन वाळविल्यास पुन्हा वापरल्या जाऊ शकते, अशी माहिती वरद जोशी यांनी दिली.
पेपरच्या पुंगळ्यापासून कलाकृती
प्रदर्शनात रद्दीतील पेपरच्या पुंगळ्या करून त्यापासून बास्केट, कुंडी कव्हर, ज्वेलरी बॉक्स, ज्वेलरी, पेन स्टँड, बाऊल, करंडा, ट्रे तयार करण्यात आले आहे. या स्टॉलला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे अजिता खडके यांनी सांगितले.
अदिवासी मुलांच्या सुंदर कलाकृती
प्रदर्शनात मंगरुळ चव्हाळा ता. नांदगाव खंडेश्वर जि. अमरावती येथील आदिवासी फासे पारधी सुधार समितीचा स्टॉल आहे. स्टॉलवर प्रश्नचिन्ह आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सुंदर कलाकृती विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यात दांडिया, कुंड्या, लॅम्प, आरसा, झुंबर आदींचा समावेश आहे.
१०० प्रकारचे दागिने
प्रदर्शनात नॅचरोपॅथीच्या डॉ. सीमा छाजेड यांच्या स्टॉलवर कॉस्मेटिक, लिपस्टीक, फेसपॅक, ओरिजीन्स कंपनीची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर किरण सोमकुवर यांनी हायगोल्ड, चांदबाली, एचडी मंगळसूत्र, बांगड्या असे १०० प्रकारचे दागिने उपलब्ध करून दिलेले आहेत.