नागपूर सिटी अॅपवरील दहा हजार तक्रारी सोडविल्याचा दावा खोटा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 10:09 AM2020-07-09T10:09:18+5:302020-07-09T10:11:41+5:30
मनपाच्या ‘नागपूर लाईव्ह सिटी अॅप’ वर ११०६८ तक्रारी प्राप्त झाल्या. यातील १० हजार तक्रारींचे निराकरण करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. हा दावा खोटा आहे. झोन स्तरावर निधीच उपलब्ध नसताना कामे कशी केली, याची तक्रारनिहाय माहिती प्रशासनाने माहिती द्यावी, अशी मागणी पदाधिकारी व नगरसेवकांनी केली आहे.
गणेश हूड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागरिकांना महापालिकेच्या संबंधित काम वा तक्रार देण्यासाठी कार्यालयात येण्याची गरज भासू नये, यासाठी एका क्लिकवर त्यांच्या समस्यांचे तात्काळ समाधान होत आहे. मनपाच्या ‘नागपूर लाईव्ह सिटी अॅप’ वर ११०६८ तक्रारी प्राप्त झाल्या. यातील १० हजार तक्रारींचे निराकरण करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. तर प्रशासनाचा हा दावा खोटा आहे. झोन स्तरावर निधीच उपलब्ध नसताना कामे कशी केली. कुठल्या कामावर किती खर्च झाला, हा खर्च कशातून केला, याची तक्रारनिहाय माहिती प्रशासनाने माहिती द्यावी, अशी मागणी पदाधिकारी व नगरसेवकांनी केली आहे. आधीच पदाधिकारी व आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यात संघर्ष सुरू असताना तक्रारीच्या मुद्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.
सिवर लाईन,चेंबर व नाल्या दुरुस्ती, पाण्याची लाईन दुरुस्ती, अशा स्वरूपाच्या तब्बल ४१९१ तक्रारी प्राप्त झाल्या. यातील ३५२० तक्रारी सोडवल्याचा प्रशासनाचा दावा आहे. परंतु नाल्या, चेंबर दुरुस्तीसाठी निधीच उपलब्ध नसताना दुरुस्ती कशी केली, असा सवाल नगरसेवकांनी केला आहे. बांधकाम विभागाकडे रस्ते, डांबरीकरणासंदर्भात १३७६ तक्रारी आल्या. रस्ते दुरुस्ती व डांबरीकरणाची कामे ठप्प असताना या तक्रारी सोडविण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. यात तथ्य नाही, असे नगरसेवकांचे म्हणणे आहे. अतिक्रमण विभागाकडे ५२६ तक्रारी आल्या. यातील ४५० तक्रारी निकाली काढण्यात आल्या. परंतु मागील तीन महिन्यात अतिक्रमण कारवाई जवळपास बंद आहे.
नागरिकांना महापालिकेशी संबंधित सर्व प्रकारच्या तक्रारी करण्याची सोय अॅपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहे. यावर आयुक्तांचे नियंत्रण असून अॅपच्या माध्यमातून प्राप्त तक्रारींचे निराकरण निर्धारित कालावधीत न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावली जाते.
नगरसेवकांनी दिलेल्या तक्रारी सोडविल्या जात नाहीत. मी स्वत: माझ्याकडे आलेल्या १ हजाराहून अधिक तक्रारी दिल्या. आजवर त्या सोडविल्या नाहीत. आॅनलाईन तक्रारीला प्राधान्य दिले जात आहे. मग नगरसेवक नागरिकांच्या तक्रारी कशा सोडवतील? मनपा प्रशासन १० हजाराहून अधिक तक्रारी सोडविल्याचा दावा करीत आहे. पैसेच नाही तर त्या कशा सोडविल्या, खर्च कसा आणि कोठून केला, याची प्रशासनाने तक्रारनिहाय माहिती दिली तर वस्तुस्थिती स्पष्ट होईल.
पिंटू झलके, अध्यक्ष स्थायी समिती
गडर, चेंबर व नाली दुरुस्ती अशी लहानसहान कामे सांगितली तर झोन स्तरावर पैसे नाहीत असे सांगितले जाते. आम्ही सुचविलेली अत्यावश्यक कामे होत नाहीत. पैसे नसताना मनपा प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारी तातडीने कशा सोडविल्या, हा संशोधनाचा विषय आहे. तक्रारीच्या माध्यमातून नेमकी कोणती कामे केली व किती खर्च झाला याची माहिती उपलब्ध केली तर आक्षेप घेण्याची गरज पडणार नाही.
संजय महाकाळकर, नगरसेवक
आयुक्त मुंढेंच्या माध्यमातून काँग्रेसची मक्तेदारी
राज्य सरकार बदलले आणि सूडाचे राजकारण सुरू झाले. मनपाचे प्रशासन वादात आहे. तुकाराम मुंढे आल्यापासून सत्ताधाऱ्यांना बदनाम करण्याचे सत्र सुरू आहे. एकतर्फी कारभार, स्वत:च निर्णय घेणे सुरू आहे. लोकप्रतिनिधी, नगरसेवक यांना भेटीची परवानगी नाकारण्यात येते. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष यांनी घेतलेल्या लोकहिताचे निर्णय फिरवण्यात आले. मुंढे हे सत्ताधाºयांची लाचारी पत्करून काम करताहेत. एकप्रकारे मुंढेंच्या माध्यमातून महापालिकेत काँग्रेसची मक्तेदारी सुरू आहे.
गिरीश व्यास