‘घरवापसी’साठी दबाव येत असल्याचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:36 AM2017-10-30T00:36:16+5:302017-10-30T00:37:03+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांसाठी होणाºया निवडणुकांसंदर्भात वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांसाठी होणाºया निवडणुकांसंदर्भात वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. ‘सेक्युलर पॅनल’शी जुळलेले शंभरहून अधिक प्राध्यापक शिक्षण मंचात आल्याचा दावा करण्यात आला होता. तर ‘सेक्युलर’तर्फे हा दावा खोडून काढण्यात आला होता. मात्र आता शिक्षण मंचात प्रवेशित काही सदस्यांना ‘घरवापसी’साठी दिग्गजांचे फोन येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विद्यापीठातील अभ्यासमंडळावर सदस्य नेमणुकीपासून तर पदवीधर, प्राचार्य, शिक्षक आणि व्यवस्थापनातील प्रतिनिधींच्या जागांवर आपले प्रतिनिधी पाठविण्यासाठी विविध संघटनांमध्ये चढाओढ आहे. यात ‘यंग टीचर्स असोसिएशन’, ‘सेक्युलर पॅनल’, ‘नुटा’ आणि विद्यापीठ शिक्षण मंच यांचा प्रामुख्याने समावेश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या ‘सेक्युलर पॅनल’शी औषधनिर्माण शास्त्रातील शंभरहून अधिक प्राध्यापक जुळले होते. मागील निवडणुकांत ‘यंग टीचर्स असोसिएशन’ने ‘सेक्युलर’चे वर्चस्व होते तर ‘सेक्युलर’लादेखील चांगले यश मिळाले होते. मागील निवडणुकांत विद्यापीठ शिक्षण मंचला फारसा प्रभाव दाखविता आला नव्हता. मात्र गेल्या तीन वर्षांत गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील वर्चस्वात बदल झाला आहे.
त्यामुळे विद्यापीठ शिक्षण मंचासाठी यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची आहे. अगदी भाजपच्या मोठमोठ्या नेत्यांचेदेखील मंचला प्रोत्साहन मिळत आहे. त्यातूनच निवडणुकांच्या अगोदरपासूनच विद्यापीठ शिक्षण मंचने अनेक दिवसांपासून संपर्क अभियान सुरू केले.
विरोधी गटातील कोणकोणते सदस्य आपल्या खेम्यात येऊ शकतात, याचा अभ्यासदेखील करत औषधनिर्माण शास्त्रातील ‘सेक्युलर पॅनल’शी संबंधित अनेक प्राध्यापक आपल्या खेम्यात ओढून घेतले. आमचे प्राध्यापक फुटले नसल्याचा दावा ‘सेक्युलर पॅनल’तर्फे करण्यात आला होता.
मात्र आता काही प्राध्यापकांनी ‘सेक्युलर पॅनल’च्या उभारणीत मौलिक भूमिका पार पाडणाºया दिग्गजांचाच आपल्याला दूरध्वनी येत असल्याचे म्हटले आहे. तुमची नाराजी असेल ती दूर करू, मात्र ‘घरवापसी’ करा अशी विनंती करण्यात येत असल्याचे काही प्राध्यापकांनी ‘लोकमत’ला सांगितले.
तथ्यहीन दावा : वंजारी
यासंदर्भात ‘सेक्युलर पॅनल’चे नेतृत्व करणारे अॅड.अभिजित वंजारी यांना विचारणा केली असता या दाव्यांमध्ये काहीच तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले. मुळात औषधनिर्माण शास्त्रात १४३ मान्यताप्राप्त शिक्षक आहेत. त्यातील मोजके प्राध्यापक दुसºया संघटनेत गेले. मात्र त्यामुळे आम्हाला फारसा फरक पडलेला नाही. आम्ही आमच्या मोर्चेबांधणीकडे लक्ष देत आहोत. कुणाला दूरध्वनी करुन परत बोलविण्याचा प्रश्नच येत नाही, असे वंजारी यांनी स्पष्ट केले.
फोडाफोडी केली नाही : पांडे
विद्यापीठ शिक्षण मंचात औषधनिर्माण शास्त्राचे सुमारे १०० प्राध्यापक आले आहे ही बाब एकदम खरी आहे. यात कुठल्या संघटनेचे किती प्राध्यापक आहेत, याचा हिशेब आम्ही लावलेला नाही. मात्र आम्ही यासाठी कुठलेही फोडाफोडीचे राजकारण केलेले नाही. आमच्याकडे स्वेच्छेने आलेल्या प्राध्यापकांना सन्मान देत त्यांचे आम्ही स्वागत केले आहे. आता ‘घरवापसी’साठी कोण कुणाला फोन करत आहे, याची काहीही माहिती आमच्यापर्यंत आलेली नाही, असे शिक्षण मंचच्या अध्यक्षा डॉ. कल्पना पांडे यांनी सांगितले.