अन् चक्क पोलिस स्टेशनमध्येच दोन कर्मचाऱ्यात फ्री स्टाईल हाणामारी
By जितेंद्र ढवळे | Published: October 12, 2023 05:22 PM2023-10-12T17:22:53+5:302023-10-12T17:24:01+5:30
नशेत तर्र अन् शिवीगाळ
नागपूर : ‘सद्रक्षणाय, खल निग्रहणाय’ हे ब्रीद खांद्यावर घेत, कायदा व सुव्यवस्थेसह समाजात शांतता नांदविण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. मात्र, या ब्रिदाला तिलांजली देत, भिवापूर पोलिस स्टेशनमध्ये बुधवारी (दि.११) रात्री दोन पोलिस कर्मचाऱ्यांत जबदरदस्त फ्री स्टाईल झाली. ७ मिनिटांहून अधिक वेळ चाललेल्या या राड्यात नशेत तर्र असलेले दोन्ही पोलिस कर्मचारी एकमेकांना शिव्या देत लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत होते. काही पोलिस कर्मचारी व होमगार्ड सैनिक या घटनेचे प्रत्यक्षदर्शीही आहेत. मात्र भिवापूर पोलिसांनी अद्यापही या घटनेचा दुजोरा दिलेला नाही.
बुधवारी (दि.११) ठाणेदार जयपालसिंग गिरासे रात्री साधारण ८ वाजताच्या सुमारास लगतच्या एका कार्यक्रमाला गेले होते. त्यानंतर रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास नशेत बेधुंद असलेले ते दोन्ही पोलिस कर्मचारी पोलिस स्टेशनच्या आवारात आमने-सामने आले. यातील एकाने दुसऱ्याला शिवीगाळ केली. ते कर्मचारी दिवसाढवळ्या वर्दीवरच दारू ढोसून, महिला असो की पुरुष कर्मचारी यांच्या समक्ष कुणालाही नेहमीच अश्लील शिवीगाळ करीत असल्याने तालुक्याची पोलिस यंत्रणा हतबल आहे. घटनेच्या रात्री सुद्धा नशेत तर्र असलेल्या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांत शिवीगाळ करण्यावरून बिनसले. नंतर ते मारहाणीपर्यंत आले. जमिनीवर लोळवून लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याचे समजते. यावेळी पोलिस स्टेशनच्या आत काही कर्मचारी तर आवारात एक पोलिस कर्मचारी आणि चार होमगार्ड उपस्थित होते.
पोलिस कर्मचाऱ्यांतील तुफान राडा पाहून उपस्थित होमगार्ड सैनिकांनी घटनास्थळावरून पाय काढला. तर एका पोलिस कर्मचाऱ्याने मध्यस्थी करत, भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यातील एकाने ‘आज बीच मे कोई नही आयेगा’ असा इशारा दिल्याने तो पोलिस कर्मचारीसुद्धा थबकला. आता यावर उपविभागीय पोलिस अधिकारी राजा पवार व पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार काय कारवाई करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.