आयुक्तांनी घेतला सहायक आयुक्तांचा क्लास
By admin | Published: May 9, 2017 02:03 AM2017-05-09T02:03:20+5:302017-05-09T02:03:20+5:30
राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छता सर्वेक्षणात नागपूर माघारले आहे. यामुळे शहराची प्रतिमा मलिन होत आहे.
प्रभागात फिरा : नागरिकांच्या तक्रारी दूर करा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छता सर्वेक्षणात नागपूर माघारले आहे. यामुळे शहराची प्रतिमा मलिन होत आहे. सोमवारी महापालिका सभागृहातही स्वच्छतेच्या मुद्यावरून विरोधी व सत्ताधारी नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. आयुक्त अश्विन मुदगल यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. सभागृहाचे कामकाज संपताच मुदगल स्वत: सहायक आयुक्तांजवळ गेले. त्यांनी झोनच्या सर्व सहायक आयुक्तांना सकाळी ७ वाजता झोनमधील प्रभागांचा दौरा करा, स्वच्छतेचा आढावा घेऊ न त्रुटी दूर करा असे निर्देश दिले.
स्वच्छतेत नागपूर का माघारले या संदर्भात लोकमतने वृत्तमालिका प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. महापालिकेच्या कारभारावर नागरिकही नाराज आहेत. स्वच्छतेत नागपूर शहराचा क्रमांक २० वरून १३७ वर पोहचला आहे. यामुळे शहराच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. त्यातच हाती घेण्यात आलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या कामाबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत.
महापौरांच्या आसनामागे आयुक्तांनी सहायक आयुक्तांचा दहा मिनिटे क्लास घेतला. स्वच्छतेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही. नागरिकांच्या तक्रारी तातडीने दूर करण्याचे निर्देश दिले. तसेच नादुरस्त रस्ते पावसाळ्यापुर्वी दुरुस्त करा. फुटपाथची डागडुजी करण्यात यावी, यासाठी सहायक आयुक्तांनी आपल्या अधिकाराचा वापर करा अशा सूचना मुदगल यांनी केल्या.