दहावी, बारावीच्या परीक्षेचे पेपर फुटले?
By Admin | Published: March 10, 2016 03:33 AM2016-03-10T03:33:13+5:302016-03-10T03:33:13+5:30
सोशल साईट वापर करून वर्ग १० व १२ वी च्या बोर्डाच्या परीक्षेचे पेपर ‘लिक’ होत असल्याचा गंभीर प्रकार नागपुरातील एका केंद्रावर उघडकीस आला आहे.
सोशल साईटचा वापर : नागपुरातील एका केंद्रातील प्रकार
आशिष दुबे नागपूर
सोशल साईट वापर करून वर्ग १० व १२ वी च्या बोर्डाच्या परीक्षेचे पेपर ‘लिक’ होत असल्याचा गंभीर प्रकार नागपुरातील एका केंद्रावर उघडकीस आला आहे. बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी नाव न सांगता याला दुजोरा दिला आहे. लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार, बोर्डात परीक्षा केंद्रावर मोबाईल वापरण्यास कुठलीही बंदी नसल्याने याचा फायदा घेऊन काहीजण पेपर लिक करीत आहे. उत्तर नागपुरातील एका केंद्रावर १२ वीच्या पेपर दरम्यान असा प्रकार उघडकीस आला असल्याची सूत्रांची माहिती आहे. या केंद्रावर काही विद्यार्थी पेपर सुरू झाल्यानंतर बऱ्याच वेळाने केंद्रावर पोहचले होते. परंतु केंद्राच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले होते.
परंतु एका अन्य पेपर दरम्यान काही विद्यार्थी उत्तर नागपुरातील केंद्राच्या जवळ चर्चा करीत होते. त्यावेळी केंद्र अधिकाऱ्यांनी त्या विद्यार्थ्यांना पेपर सुरू झाला असून, वर्गात जाण्यास सांगितले. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात प्रवेश केल्यानंतर केंद्र अधिकारी त्यांच्यावर नजर ठेवून होते. सूत्रांच्यानुसार त्या विद्यार्थ्यांची तपासणी केली असता त्यांच्याजवळून मोठ्या प्रमाणात कॉपी सापडली. काही विद्यार्थ्यांनी प्रश्नाचे उत्तर हातावर लिहून आणले होते.
प्रश्नपत्रिकेत विचारलेले प्रश्न व कॉपीची तपासणी केली असता समानता दिसून आली. या प्रकरणाची माहिती बोर्डाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. असाच प्रकार नागपूर विभागीय मंडळाच्या भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील केंद्रावर वर्ग दहावीच्या परीक्षादरम्यान घडला.
याची माहिती विभागीय अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी भरारी पथकाला रवाना केले होते. या कारवाईमध्ये केंद्रावर मोठ्या प्रमाणात कॉपी झाल्याचा खुलासा झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.