बारावी निकाल ; ‘इंग्रजी’चा दे धक्का !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 10:31 AM2019-05-29T10:31:24+5:302019-05-29T10:33:41+5:30
मंगळवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालांमध्ये नागपूर विभागात इंग्रजी विषयाचा विद्यार्थ्यांना फटका बसल्याचे दिसून येत आहे.
योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मंगळवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालांमध्ये नागपूर विभागात इंग्रजी विषयाचा विद्यार्थ्यांना फटका बसल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदादेखील इंग्रजीचा निकाल माघारला आहे. एकूण १३० विषयांपैकी सर्वात कमी म्हणजेच ८३.२२ टक्के निकाल इंग्रजी विषयाचा लागला आहे. दरम्यान यंदा ३९ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. मागील वर्षी ५८ विषयांचा निकाल ‘सेंट परसेंट’ होता. यंदा ही आकडेवारी घटली आहे.बारावीत विद्यार्थ्यांना गणित व इंग्रजीची सर्वाधिक भीती वाटत असते. मागील वर्षी गणिताचा निकाल ९५.५६ टक्के लागला होता. यंदा त्यात पाच टक्क्यांहून अधिक घट झाली असून ८९.४४ टक्के विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले आहेत. याशिवाय भौतिकशास्त्र (९२.७०%), जीवशास्त्र (९५.७४%) व रसायनशास्त्र (९४.१० %)या विषयांचा निकालदेखील माघारला आहे. मराठीचा निकाल ९५.१३ टक्के तर हिंदीचा निकाल ९८.०२ टक्के लागला आहे. संस्कृतमध्ये ९९.४४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
दोन विषयांना प्रत्येकी एकच परीक्षार्थी
यंदा १३० पैकी २७ विषयांमध्ये ५० किंवा त्याहून कमी परीक्षार्थी होते. दोन विषयांमध्ये तर प्रत्येकी एकच परीक्षार्थी होता. हे दोन्ही जण उत्तीर्ण झाले आहेत. विभागात सर्वात अधिक १ लाख ६३ हजार ६०७ विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयांची परीक्षा दिली. तर १ लाख ११ हजार ५२६ विद्यार्थी मराठीच्या परीक्षेला प्रविष्ट झाले होते.