‘तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे वर्ग करा’, जनहित याचिका दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 06:01 AM2020-08-05T06:01:35+5:302020-08-05T06:02:27+5:30
मुंबई पोलीस आयुक्त व वांद्रे पोलीस यांच्याकडून होत असलेल्या उशिरामुळे प्रत्येक दिवशी महत्त्वाची कागदपत्रे व पुरावे नष्ट केली जात आहेत, असे ठक्कर यांनी याचिकेत म्हटले आहे
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून काढून घेऊन सीबीआय किंवा विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) वर्ग करावा किंवा मुंबईबाहेर हे प्रकरण वर्ग करावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका नागपूरचे रहिवासी समित ठक्कर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
मुंबई पोलीस आयुक्त व वांद्रे पोलीस यांच्याकडून होत असलेल्या उशिरामुळे प्रत्येक दिवशी महत्त्वाची कागदपत्रे व पुरावे नष्ट केली जात आहेत, असे ठक्कर यांनी याचिकेत म्हटले आहे. बॉलीवूड, राजकारण आणि अंडरवर्ल्ड यांचे एकमेकांशी संबंध आहेत. याला सुशांत बळी ठरला आणि त्याचमुळे त्याने आत्महत्या केली, असे याचिकेत म्हटले आहे.
सुशांतच्या घरात काम करणाऱ्या एकाने वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत आणि मुंबई पोलिसांचा अहवाल यात तफावत आहे. उदा. घरातील काम करणाºयाने पोलिसांना सांगितले की, आत्महत्येपूर्वी सुशांतने फळाचा रस प्यायला आणि त्यानंतर तो जॉगिंगला गेला. मात्र, याचा उल्लेख पोलिसांनी केला नाही, असे याचिकेत म्हटले आहे. सुशांतचे टिष्ट्वटर आणि फेसबुक अकाउंट त्याच्या मृत्यूनंतरही कोणी तरी वापरत होते, बॉलीवूडचे काही अभिनेता, अभिनेत्री, डायरेक्टर यांनीही समाजमाध्यद्वारे सुशांतला फिल्म इंडस्ट्रीतले काही बड्या लोकांनी लक्ष्य केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे प्रकरणाचा नीट तपास करावा, अशी मागणी याचिकेत आहे. याशिवाय ठक्कर यांना पोलीस संरक्षण द्यावे, कारण बॉलीवूड माफियाकडून त्यांना धमक्या येत आहेत, अशीही विनंतीही त्यांनी न्यायालयाला याचिकेद्वारे केली आहे. बुधवारी या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.