‘मातीचे मडके’ थंड पडले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 10:25 AM2020-04-23T10:25:53+5:302020-04-23T10:26:23+5:30
कोरोनाच्या धास्तीने डॉक्टरांनी फ्रीजचे पाणी टाळण्याच्या केलेल्या आवाहनाने अधिक भर घातली आणि नागरिक मातीचे मडके शोधायला लागले आहे. परंतु, लॉकडाऊनचा फटका असा काही बसला आहे की मागणी असतानाही पुरेसा माल उपलब्ध नसल्यामुळे मडक्यांचा व्यापार थंडबस्त्यात गेला आहे.
प्रवीण खापरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फ्रीज घरोघरी असले तरी मातीच्या मडक्यातील गार पाण्याची चव आजही गोडच वाटते. त्यात कोरोनाच्या धास्तीने डॉक्टरांनी फ्रीजचे पाणी टाळण्याच्या केलेल्या आवाहनाने अधिक भर घातली आणि नागरिक मातीचे मडके शोधायला लागले आहे. परंतु, लॉकडाऊनचा फटका असा काही बसला आहे की मागणी असतानाही पुरेसा माल उपलब्ध नसल्यामुळे मडक्यांचा व्यापार थंडबस्त्यात गेला आहे.
मुळात शहरात कुंभारांच्या अनेक वस्त्या असल्या आणि त्यांचे मूळ काम मडके बनविण्याचे असले तरी नागपुरात मडके बनविले जात नाही. संपूर्ण विदर्भात मडक्यांची आवक भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, मध्य प्रदेश, छत्तीसगड व बालाघाट येथून प्रामुख्याने होते. मात्र, लॉकडाऊनमुळे राज्यच नव्हे तर जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. अशात या जिल्ह्यातून येणारे मडके नागपूर व विदर्भात पोहोचत नाहीत. त्यामुळे, नागपूरसह विदर्भातील मडक्यांची विक्री करणाऱ्या कुंभारांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. नागपूरच्या ग्रामीण भागांतूनही तेथील कुंभार शहरातील मडके विक्रेत्यांकडे पाठवत असतात. मात्र, वाहतूक पोलिसांच्या कठोर निर्बंधामुळे मडके पोहोचत नसल्याचे दिसून येते. शहरात दरवर्षी उन्हाळ्यात लाखोच्या संख्येने मडके विकले जातात. मार्च, एप्रिल आणि मे हे तीन महिने या व्यवसायासाठी विशेष असतात. मात्र, लॉकडाऊनमुळे हजारही मडके उपलब्ध नाहीत, अशी स्थिती सध्या कुंभारांवर ओढवली गेली आहे. कोरोनाच्या भीतीने लोकही दरवर्षीच्या तुलनेत यंदा मडक्यांची जादा मागणी करत असल्याचे दिसून येते. लॉकडाऊनमुळे घराच्या बाहेर पडता येत नसले तरी संचारबंदीत थोडी नरमाई असल्याच्या काळात नागरिक बाजार हिंडत आहेत. मात्र, मडके विके्रते दिसत नसल्याने उदास मनाने परत फिरण्याची वेळ नागरिकांवर येऊन ठेपली आहे. मागणी असली तरी पुरवठा नाही आणि पुरवठा नाही म्हणून विक्रेते अडचणीत आले आहेत.
अक्षय्य तृतीयेला लागतात घरोघरी मडके
: हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या दिवशी कळसपूजन घरोघरी होते. त्यासाठी कळशी (मडके) विकत घेण्याची जुनी परंपरा आहे. मात्र, यंदा नागरिकांना विना कळसपूजन हा सण साजरा करावा लागण्याची शक्यता आहे. हा दिवस मडके विके्र त्यांसाठीही अत्यंत महत्त्वाचा असतो. संपूर्ण मोसमात याच दिवशी मडक्यांची विक्री पाच पटीने होत असते. मात्र, नागरिक आणि विक्रेते, दोघेही संकटात सापडले आहेत.
कुंभार वस्तीतच विक्रीची परवानगी द्यावी - सुरेश पाठक
कुंंभारांची दयनीय स्थिती बघता प्रशासनाकडून कस्तुरचंद पार्क, रेशीमबाग, चिटणीस पार्क मैदानात मडके विकण्याची व्यवस्था करण्याचा विचार सुरू आहे. मात्र, एक-दोन दिवसासाठी संपूर्ण माल नेणे व पुन्हा परत आणणे परवडणारे नाही. उलट यात नुकसानच जास्त आहे. त्याअनुषंगाने मार्ग काढण्याच्या मागणीचे निवेदन हस्तशिल्पी बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुरेश पाठक यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना दिले. त्यात मडक्यांच्या पुरवठ्यासाठी लॉकडाऊन सैल करण्याची मागणीही आहे. शिवाय, शहरात पारडी, दिघोरी चौक, सक्करदरा बाजार, नेताजी मार्केट, केडीके कॉलेज रोड, लालगंज कुंभारपुरा, जुनी मंगळवारी कुंभारपुरा, पाचपावली कुंभारपुरा, बुधवारी कुंभारपुरा, बाळाभाऊपेठ, कमाल टाकीज चौक, मंगळवारी सदर बाजार, डिप्टी सिग्नल, महाल कल्याणेश्वर मंदिर, गोकुळपेठ येथे विक्रीस परवानगी देण्याची मागणी अ.भा. प्रजापती कुंभार समाज संस्थेतर्फे करण्यात आली आहे.