कालव्यांची साफसफाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:07 AM2021-06-10T04:07:40+5:302021-06-10T04:07:40+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : सत्रापूर उपसा सिंचन याेजनेंतर्गत तालुक्यात कालव्याची निर्मिती करण्यात आली. काेरडवाहू क्षेत्र ओलितखाली यावे, हा ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : सत्रापूर उपसा सिंचन याेजनेंतर्गत तालुक्यात कालव्याची निर्मिती करण्यात आली. काेरडवाहू क्षेत्र ओलितखाली यावे, हा या मागील मुख्य उद्देश हाेता. त्यामुळेच तालुक्यातील साेनेघाट, मुसेवाडीपर्यंत याेजनेचा विस्तार करीत या भागात लहान कालवे बनविण्यात आले. परंतु या कालव्यांच्या स्वच्छतेकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाल्याने सद्यस्थितीत कालव्यांमध्ये कचरा व झुडपे वाढली आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी कालव्यांची साफसफाई करा, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.
पावसाळ्यापूर्वी कालव्याच्या पाटचऱ्यांची दुरुस्ती तसेच साफसफाई करणे नितांत गरजेचे आहे. कालव्यामध्ये कचरा व झाडेझुडपे वाढली आहे. त्यामुळे शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पाेहचत नाही. शिवाय, कालवे बनविताना उताराकडे व्यवस्थित लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे वरच्या भागात पाणी चढत नाही. यामुळे काही शेतकऱ्यांना पाणी मिळते, तर काहींना मिळत नाही. त्यामुळे कालव्यांचे खाेलीकरण करणे गरजेचे झाले आहे.
या भागातील बहुतांश शेतकरी धान पीक घेतात. ऐन धान राेवणीदरम्यान वीज बिलापाेटी वीज पुरवठा खंडित केला जाताे. महत्त्वाच्या वेळी पाणी पुरवठा बंद हाेताे. त्यामुळे प्रशासनाने पाण्यासाठी आधीच उपाययाेजना करून ठेवावी. नापिकीमुळे शेतकरी त्रस्त आहेत. मागील वर्षी तुडतुडा व इतर राेगांमुळे धान पीक उद्ध्वस्त झाले. यात शेतकऱ्यांना माेठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांकडील विद्युत बिल माफ करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
....
पुलाचे बांधकाम करा
सत्रापूरपासून पेंच प्रकल्पावर ही उपसा सिंचन याेजना सुरू करण्यात आली. साेनेघाट, मुसेवाडीपर्यंत याेजनेचा विस्तार आहे. याेजनेंतर्गत या भागात लहान कालव्यांची निर्मिती करण्यात आली. मात्र शेतकऱ्यांच्या वहिवाटीबाबत काेणताही विचार झालेला नाही. शेतात ये-जा करण्यासाठी काेणतीही व्यवस्था केली नाही. त्यामुळे पावसाळ्यात या भागातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यास अडचण निर्माण हाेते. त्यामुळे या कालव्यावर किमान ३०० मीटरपर्यंत एका पुलाचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.