विद्यार्थिनी छळ प्रकरणात प्राध्यापकाला ‘क्लीन चिट’, चौकशी समिती म्हणते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2022 10:56 AM2022-05-06T10:56:57+5:302022-05-06T11:02:09+5:30

यासंबंधातील चौकशी समितीने विद्यार्थिनींच्या तक्रारीत तथ्य नसल्याचा निर्वाळा दिला आहे.

'Clean chit' to professor in student harassment case at RTM nagpur university | विद्यार्थिनी छळ प्रकरणात प्राध्यापकाला ‘क्लीन चिट’, चौकशी समिती म्हणते...

विद्यार्थिनी छळ प्रकरणात प्राध्यापकाला ‘क्लीन चिट’, चौकशी समिती म्हणते...

Next

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर हिंदी विभागातील विद्यार्थिनींच्या मानसिक छळ प्रकरणात सहायक प्राध्यापक डॉ. मनोज पांडे यांना ‘क्लीन चिट’ दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासंबंधातील चौकशी समितीने विद्यार्थिनींच्या तक्रारीत तथ्य नसल्याचा निर्वाळा दिला आहे.

पीएच.डी.साठी संशोधन आणि विषयाचा आराखडा सादर करण्यासाठी हिंदी विभागातील डॉ. मनोज पांडे यांनी आपल्याला अपमानास्पदरीत्या वागणूक देत मानसिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून छळ केल्याचा पीडित विद्यार्थिनींनी आरोप केला होता. यानंतर विद्यापीठाने सेवानिवृत्त न्यायाधीश मीरा खडक्कार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली. या तक्रारीवर विद्यापीठाने सुरुवातीपासूनच बचावात्मक पवित्रा घेतला. कुलगुरूंनी तर विद्यार्थिनींच्या सिनॉप्सिसवरदेखील शंका व्यक्त केली.

यासंबंधात राज्यपाल कार्यालय व उच्च-तंत्रशिक्षण विभागाकडून विचारणा झाल्यावर विद्यापीठाने डॉ. पांडे यांना नोटीस बजावली. काही दिवसांअगोदर चौकशी समितीचा अहवाल विद्यापीठाला सादर करण्यात आला, मात्र तो गुलदस्त्यात ठेवण्यात आला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यात डॉ.पांडे यांना ‘क्लीन चिट’ देण्यात आली आहे. विद्यार्थिनींची तक्रार तथ्यहीन असल्याचा निर्वाळा यात देण्यात आला आहे. याबाबत प्रतिक्रियेसाठी कुलसचिव डॉ.राजू हिवसे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

समितीवरच घेतले होते आक्षेप

विद्यापीठाने नेमलेल्या समितीवर आधीपासून आक्षेप घेण्यात आला होता. समितीमध्ये असणारे दोन सदस्य हे हिंदी विभागाचे आणि डॉ. पांडे यांच्या नजिकचे असल्याचा आरोप करत चौकशी समितीकडून पक्षपातीपणा होण्याचा आक्षेप विद्यार्थिनींच्या मार्गदर्शिका डॉ. सोनू जेसवानी यांनी घेतला होता हे विशेष.

Web Title: 'Clean chit' to professor in student harassment case at RTM nagpur university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.