तीन नद्यांसह नाल्यांची स्वच्छता करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2016 03:08 AM2016-05-08T03:08:27+5:302016-05-08T03:08:27+5:30

नागपूर शहरातील नाग, पिवळी व पोरा या तीन प्रमुख नद्यांसह लहान नाले तसेच ग्रामीणमधील २३४ पूरप्रवण गावांमधील नाल्यांची स्वच्छता करा.

Clean the drains with three rivers | तीन नद्यांसह नाल्यांची स्वच्छता करा

तीन नद्यांसह नाल्यांची स्वच्छता करा

Next

पालकमंत्र्यांचे आदेश : आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक
नागपूर : नागपूर शहरातील नाग, पिवळी व पोरा या तीन प्रमुख नद्यांसह लहान नाले तसेच ग्रामीणमधील २३४ पूरप्रवण गावांमधील नाल्यांची स्वच्छता करा. सोबतच नदी व नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करून ५ जूनपर्यंत नदी व नाले सफाईची सर्व कामे पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी दिले. पालकमंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील बचतभवन सभागृहात आयोजित आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक घेण्यात आली.
महापौर प्रवीण दटके, आमदार सुधाकर देशमुख, प्रा. अनिल सोले, सुधाकर कोहळे, आशिष देशमुख, सुधीर पारवे, समीर मेघे, मल्लिकार्जुन रेड्डी, स्थायी समिती अध्यक्ष बंडू राऊत, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कादंबरी भगत, वेकोलिचे सीएमडी राजीवरंजन मिश्रा आदी उपस्थित होते.
शहरातील नाग, पिवळी व पोरा नदीची स्वच्छता सुरू आहेच. सोमवारी ९ मे रोजी या अभियानाचे रीतसर उद्घाटन होईल. तसेच मनपा क्षेत्रात नाले सफाईसाठी दहा वेगळ्या मशीन कामाला लावल्या जातील. १० कि.मी.पर्यंतची संपूर्ण नदी स्वच्छ, खोल आणि रुंद केली जाईल.
ग्रामीण भागातील येरखेडा-रनाळा, गोन्हीसीम-बहादुरा-खरबी, पारडी-बीडगाव-तरोडी, रमणामारोती-खरबी-विहीरगाव, बोकारा ते नारा, कोराडी-महादुला, वाडी-लाव्हा-अंबाझरी, बेसा-बेलतरोडी-बेसा-मानेवाडा या नाल्यांची सफाई करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा परिषदेला दिले.
सुधाकर देशमुख म्हणाले, नाल्याच्या काठावर, नाल्यात असलेले अतिक्रमण प्राधान्याने काढले पाहिजे, अन्यथा या वस्त्यांमध्ये पाणी शिरते. नुकसान भरपाई भरावी लागते. शहराच्या सीमेलगत असलेल्या वस्त्यांजवळील नाले प्राधान्याने साफ करावेत. सुधाकर कोहळे यांनी जम्बुदीपनगरमधील नाल्याची समस्या मांडली. पूरप्रवण असलेल्या २३४ गावांतील सरपंच, ग्रामसेवक व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घ्यावी. या बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांनाही निमंत्रित करावे. जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपंचायती व नगरपरिषदांच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी. यात संभाव्य पूरस्थितीची कल्पना देऊन उपाययोजना कशा कराव्यात व सतर्क राहण्याच्या सूचना द्याव्यात, असे निर्देशही बावनकुळे यांनी दिले.
आमदार आशिष देशमुख व समीर मेघे यांनीही पावसाळ्यापूर्वीच व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी केली. आपत्ती व्यवस्थापनासाठी शासनाकडून २५ लाख रुपये उपलब्ध झाले. त्या निधीतून १४ प्रकारचे साहित्य खरेदी करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष सुसज्ज आहे. आणीबाणीची स्थिती निर्माण झाली तर टोल फ्री नंबर १०७७ वर संपर्क साधता येणार आहे.(प्रतिनिधी)

संसद जल व पर्यावरण अभियान
शहरातील नागनदी, पिवळी नदी, पोरा नदीची स्वच्छता आणि खोलीकरण, रुंदीकरणासाठी सांसद जल व पर्यावरण अभियानाची घोषणा बावनकुळे यांनी बैठकीत केली. या अभियानाची सुरुवात ९ मे रोजी होणार असून ५जूनपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचा कालावधी शासकीय व स्वयंसेवी संघटनांना देण्यात आला. यापूर्वी १ मे ते १५ मे २०१३ दरम्यान तत्कालीन महापौर प्रा. अनिल सोले यांनी या तिन्ही नद्यांच्या स्वच्छतेची अभियान लोकसहभागातून यशस्वीपणे राबविले होते. सरकारी, गैरसरकारी, सामाजिक, स्वयंसेवी संस्था आणि नगरसेवक, सामान्य जनता या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी झाली होती. त्याचप्रमाणे यंदाही असेच अभियान लोकसहभागातून राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

नागनदी स्वच्छतेचे सादरीकरण
बैठकीपूर्वी महापालिकेतर्फे नागनदी स्वच्छतेचे सादरीकरण करण्यात आले. नाग नदी, पिवळी नदी व पोरा नदी या तिन्ही नद्यांच्या स्वच्छता, घाणपाणी व्यवस्थापन, नदीच्या काठावर सौंदर्यीकरण, स्वच्छतेचे जनआंदोलन यासाठी १४७७ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच सिवर लाईनचे पाणी नदीत न सोडता त्याची वेगळी व्यवस्था करण्यात येणार आहे. सिवरेज ट्रीटमेन्ट प्लांट तयार करून त्यातून स्वच्छ झालेले पाणी नदीत सोडले जाईल, असा हा प्रकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले.

विविध संस्थांचा सहभाग
नदी स्वच्छता कार्यक्रमात विविध शासकीय संस्थांनी मोठया संख्येत जेसीबी, पोकलँड, टिप्पर देण्याची तयारी दर्शवली आहे. काही संस्थांनी निधी देण्याची तयारी, तर काही संस्थांनी मनुष्यबळ देण्याची तयारी दर्शवली. या अभियानातून नदीतील गाळ काढणे, सौंदर्यीकरण करणे आदी कामे केली जातील. या अभियानात सार्वजनिक बांधकाम विभाग, सिंचन विभाग, जिल्हा परिषद, मनपा, क्रशर असोसिएशन, मेट्रो रेल, एनटीपीसी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, मॉईल, ग्रामीण नागपूर बिल्डर्स असोसिएशन, वेकोली, नासुप्र, फायर कॉलेज, गायत्री परिवार आदींचे सक्रिय सहकार्य लाभणार आहे.

Web Title: Clean the drains with three rivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.