रेल्वेचे आॅपरेशन क्लीन
By admin | Published: January 11, 2016 02:34 AM2016-01-11T02:34:26+5:302016-01-11T02:34:26+5:30
हाय अलर्टच्या काळात सुरक्षा व्यवस्थेत दिरंगाई केल्यामुळे रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
प्रशासन झाले सज्ज : आरपीएफही मैदानात
नागपूर : हाय अलर्टच्या काळात सुरक्षा व्यवस्थेत दिरंगाई केल्यामुळे रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परंतु त्यानंतर सुरक्षा यंत्रणेने खबरदारी बाळगून सलग तीन दिवस दारूची तस्करी पकडून रेल्वेस्थानकावर गस्त वाढविली. यात ३३४८ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून रेल्वे प्रशासनाने त्यांचा बंदोबस्त केला. परंतु चोरीच्या घटनांवर अंकुश ठेवण्यात अद्यापही पोलिसांना यश आलेले नाही.
स्थानकावर दारूच्या १९२ बाटल्या जप्त
रेल्वेस्थानकावर प्लॅटफार्म क्रमांक २ वर मुंबई एण्डकडील भागात ओव्हरब्रिजखाली शनिवारी रात्री ११.४५ वाजता १९२ दारूच्या बाटल्या बेवारस स्थितीत आढळल्या. रेल्वे सुरक्षा दलाने कागदोपत्री कारवाई करून या बाटल्या लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केल्या आहेत.
शनिवारी रात्री रेल्वे सुरक्षा दलाचे प्रधान आरक्षक केदार सिंह आणि राजू खोब्रागडे प्लॅटफार्म क्रमांक २ वर गस्त घालत होते. रात्री ११.४५ वाजता मुंबई एण्डकडील भागात ओव्हरब्रीजच्या खाली त्यांना एक बेवारस बॅग आढळली. आजूबाजूला उपस्थित प्रवाशांना चौकशी केली असता बॅगवर कुणीच आपला हक्क सांगितला नाही. त्यानंतर या बाबीची सूचना ड्युटीवर उपस्थित उपनिरीक्षक दिलीप कुमार यांना दिली.
त्यानंतर ही बॅग रेल्वे सुरक्षा दलाच्या ठाण्यात आणून दोन पंचासमक्ष पंचनामा केला. बॅगमध्ये ९० मिलिलिटरच्या आॅफिसर्स चॉईस कंपनीच्या १९२ बाटल्या आढळल्या. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत ८४६० रुपये आहे. त्यानंतर या बाटल्या लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्या.
नागपूर रेल्वेस्थानकावरून चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात दारूची तस्करी वाढली असून पोलिसांनी सतर्क राहून कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.