स्वच्छ सर्वेक्षणात नागपूर घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 10:59 PM2018-08-30T22:59:10+5:302018-08-30T23:00:32+5:30
केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने देशव्यापी स्वच्छ सर्वेक्षण करण्यात येत आहे. १ ते ३१ आॅगस्टपर्यंत हा सर्वेक्षणाचा कालावधी असून, २९ आॅगस्टपर्यंत नागपूर जिल्ह्यातून केवळ ७८०० नागरिकांनीच स्वच्छ सर्वेक्षणात आपले मत नोंदविले आहे. तुलनेत विदर्भातून चंद्रपूर जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षणाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने देशव्यापी स्वच्छ सर्वेक्षण करण्यात येत आहे. १ ते ३१ आॅगस्टपर्यंत हा सर्वेक्षणाचा कालावधी असून, २९ आॅगस्टपर्यंत नागपूर जिल्ह्यातून केवळ ७८०० नागरिकांनीच स्वच्छ सर्वेक्षणात आपले मत नोंदविले आहे. तुलनेत विदर्भातून चंद्रपूर जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षणाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक गावात हे सर्वेक्षण होत आहे. सर्वेक्षणातून गावातील स्वच्छता, स्वच्छतेशी निगडित कामाची गुणवत्ता लक्षात घेऊन त्यावर रँकिंग देण्यात येणार आहे. अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आठवडी बाजाराची ठिकाणे, धार्मिक स्थळे, सार्वजनिक व संस्थात्मक ठिकाण आदीचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तसेच स्वच्छतेविषयी ग्रामस्थ, ग्रा.पं. चे पदाधिकारी यांच्यात असलेली तळमळ, त्यांचे मत नोंदविण्यात आले आहे. त्याचबरोबर या सर्वेक्षणासाठी केंद्र सरकारने ‘एसएसजी-१८’ हे अॅप तयार केले आहे. नागरिकांनी आपल्या मोबाईलवर हे अॅप डाऊनलोड करून, स्वच्छतेबाबत आपले अभिप्राय त्यात द्यायचे आहे. यामध्ये ४ प्रश्न विचारण्यात आले आहे. त्याच उत्तर नागरिकांना द्यायचे आहे. या निकषाच्या आधारे प्रत्येक जिल्ह्यांचे आणि राज्यातील स्वच्छतेचे स्थान आणि क्रमवारी निश्चित होणार आहे. सर्वेक्षणात सर्वोच्च स्थान प्राप्त करणारे जिल्हे आणि राज्य यांना २ आॅक्टोबर रोजी पुरस्कृत करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे अख्खे प्रशासन कामी लागले होते. शाळा, ग्रा.पं. मध्ये त्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या. असे असतानाही नागपूर जिल्ह्यातील सर्वेक्षणाला अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही.
विदर्भात नागरिकांनी जिल्हानिहाय नोंदलेली मतं (२९ आॅगस्टपर्यंत)
चंद्रपूर - ३९१००
बुलडाणा - ३०५१७
गोंदिया - १९७४०
अमरावती - १३८०८
वर्धा - ११९६९
नागपूर - ७७९३
भंडारा - ७४८९
गडचिरोली - ४१४५
यवतमाळ - ३२८५
अकोला - ३०८८
वाशिम - २८७६