अत्यल्प खर्चात शुद्ध पाणीपुरवठा; नागपूर जिल्ह्यातील नरखेडमध्ये यशस्वी प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 10:54 AM2018-04-12T10:54:53+5:302018-04-12T10:55:02+5:30
येणीकोणी (ता. नरखेड) येथील तरुण सरपंच मनीष फुके यांच्या संकल्पनेतून अत्यल्प खर्चात गावाला शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यासाठी नैसर्गिक स्रोतांचा पुरेपूर उपयोग करण्यात आला.
श्याम नाडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : येणीकोणी (ता. नरखेड) येथील तरुण सरपंच मनीष फुके यांच्या संकल्पनेतून अत्यल्प खर्चात गावाला शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यासाठी नैसर्गिक स्रोतांचा पुरेपूर उपयोग करण्यात आला. एवढेच काय तर गावातील सांडपाण्याचा उपयोग बगीचा फुलविण्यासाठी करण्यात येत आहे.
गाव स्वच्छ, सुंदर आणि सर्वच बाबतीत स्वयंसिद्ध असावे, या ध्येयाने मनीष फुके यांना स्वस्थ बसू दिले नाही. त्यातूनच शहराप्रमाणे गावातील नागरिकांनाही शुद्ध पाणी मिळावे यासाठी त्यांनी निर्धार केला. पाहता पाहता त्यांच्या कार्याला अखेर यश आले. या उपक्रमांतर्गत गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीला पाण्याची पातळी खाली गेलेल्या तलावामधून एक नाली खोदून त्याद्वारे पाणी विहिरीत घेण्यात येऊन पाणी स्थिर करण्यात आले. त्याच विहिरीच्या बाजूला दुसरी विहीर तयार करून त्यामध्ये बारीक रेती, लहान दगड (गिट्टी), मोठे दगड टाकून त्याद्वारे पाणी शुद्ध करण्यासाठी ‘फिल्टर मीडिया’चा वापर करण्यात आला. ‘फिल्टर मीडिया’द्वारे पाणी हे नैगर्गिकरीत्या शुद्ध होत असून, ते शुद्ध पाणी ग्रामस्थांना मिळत आहे. फिल्टर मीडिया विहिरीमध्ये जवळपास २६ फूट खोलीवरून पाईपद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत सोडण्यात येते.
यामध्ये पाणी शुद्धीकरण संयंत्रणेपेक्षा कितीतरी पटीने कमी खर्च या उपक्रमावर झाला.
पिंपळगावमधून सिंचन व्यवस्था
गावाजवळील पिंपळगाव तलावामधून शेतकऱ्यांना ओलिताची सोय व्हावी यासाठी वेगवेगळी नाली न करता एकच नाली तयार करण्यात आली. त्यासाठी सामूहिकरीत्या पाईपलाईन टाकली. या नालीमुळे पाण्याचा निचरा कमी होऊन शेतकऱ्यांचे लाखो रुपये खर्च होण्यापासून त्यांनी वाचवले. वर्षभरापर्यंत या गावात पाणीटंचाई असताना आता गावात पाण्याची मुबलकता आहे.