नागपूर रेल्वेस्थानकाची साफसफाई आठ तास ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 10:13 AM2018-03-24T10:13:50+5:302018-03-24T10:14:00+5:30
उपाशीपोटी राहून रेल्वेस्थानकाच्या सफाईचे काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा संयम शुक्रवारी सुटला. त्यांनी शनिवारी सकाळपासून काम बंद आंदोलन केले. यामुळे आठ तास रेल्वेस्थानकाच्या सफाईचे काम ठप्प झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील अडीच महिन्यांपासून वेतन रखडल्यामुळे उपाशीपोटी राहून रेल्वेस्थानकाच्या सफाईचे काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा संयम शुक्रवारी सुटला. त्यांनी थकीत वेतन देण्याच्या मागणीसाठी शनिवारी सकाळपासून काम बंद आंदोलन केले. यामुळे आठ तास रेल्वेस्थानकाच्या सफाईचे काम ठप्प झाले होते. यामुळे सर्वत्र दुर्गंधीचे वातावरण होते. अधिकाऱ्यांनी वेतन देण्याचे आश्वासन दिल्यामुळे दुपारी २ वाजता सफाई कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
नागपूर रेल्वेस्थानकावरील सफाईचे काम पाहणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना मागील अडीच महिन्यांपासून वेतनच मिळाले नाही. त्यामुळे अर्धपोटी राहून रेल्वेस्थानकाची स्वच्छता करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. जुन्या कंत्राटदाराने दीड महिन्याचे तर नव्या कंत्राटदाराने चालू महिन्याचे वेतन दिले नाही. त्यामुळे सफाई कर्मचारी अडचणीत आले आहेत. दरम्यान, सफाई कामगारांना पुढील आठवड्यात त्यांचे रखडलेले वेतन देण्यात येईल, ही रक्कम संंबंधित कंत्राटदाराच्या अनामत रकमेमधून वसूल करण्यात येईल, असे रेल्वे अधिकाऱ्याने आश्वासन दिले होते. तसेच कंत्राटदाराने २२ मार्चपर्यंत वेतन करण्याचे आश्वासन कामगारांना दिले होते. परंतु आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे शुक्रवारी सकाळी ६ च्या शिफ्टमधील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरु केले. सर्व सफाई कर्मचारी रेल्वे स्थानकावरील आरोग्य अधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर एकत्र झाले.
दरम्यान, रेल्वेस्थानकावरील सफाईचे काम बंद पडल्यामुळे कचरा वाढून दुर्गंधीचे चित्र निर्माण झाले. अखेर दुपारी आश्वासन मिळाल्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.