सुंदर कलाकृतीतून स्वच्छतेचा संदेश

By admin | Published: May 30, 2016 02:18 AM2016-05-30T02:18:41+5:302016-05-30T02:18:41+5:30

एकाने कचरा टाकला की लगेच दुसरा तेथे कचरा नेऊन टाकतो. परंतु एखादी जागा अधिक स्वच्छ दिसली की...

Cleanliness of beautiful artwork | सुंदर कलाकृतीतून स्वच्छतेचा संदेश

सुंदर कलाकृतीतून स्वच्छतेचा संदेश

Next

‘आय क्लीन नागपूर’ : नागपूरला कचरा, दुर्गंधीमुक्त करण्याचा मानस
नागपूर : एकाने कचरा टाकला की लगेच दुसरा तेथे कचरा नेऊन टाकतो. परंतु एखादी जागा अधिक स्वच्छ दिसली की तेथे कचरा टाकण्याची इच्छा होत नाही ही मानवी प्रवृत्ती आहे. हीच प्रवृत्ती आय क्लिन नागपूर संस्थेने ओळखून नागपूरला कचरा आणि दुर्गंधीमुक्त करण्याचा विडा उचलला आहे. आजपर्यंत शाळा, बसस्टॉप, रेल्वेस्थानक अशा विविध ५१ ठिकाणी त्यांनी स्वच्छता अभियान राबवून कचरा न करण्याचा संदेश देण्यासाठी भिंतीवर सुंदर कलाकृती रेखाटल्या आहेत.
आय क्लिन नागपूर संस्थेचा शुभारंभ ९ नोव्हेंबर २०१४ रोजी रामदासपेठच्या जयकल्पना बिल्डींग येथून झाला. सुरुवातीला या संस्थेत केवळ ६ महिला होत्या. पहिल्याच दिवशीच्या उपक्रमात ३५ जण सहभागी झाले. ही संस्था शहरात जेथे घाण आहे ती जागा हेरून तेथे स्वच्छता अभियान राबविते.
त्या जागेची सफाई केल्यानंतर तेथील भिंतीला टेराकोटा कलर लावण्यात येतो. त्यानंतर त्यावर वार्ली पेंटींग करून स्वच्छ, सुंदर नागपूरचा संदेश देणारी घोषवाक्ये तसेच कलाकृती साकारण्यात येतात. ही वाक्ये आणि पेंटींग रस्त्याने ये-जा करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. आतापर्यंत नागपूर रेल्वेस्थानकाच्या होम प्लॅटफार्म, अजनी रेल्वे बसस्टॉप, महाराजबाग गेट, विद्यापीठ ग्रंथालय बसस्टॉप, परांजपे शाळा, धीरन कन्या शाळा, व्हीएनआयटी बसस्टॉप, आयटी पार्क बसस्टॉप, यशवंत स्टेडियम बसस्टॉप अशा ५१ ठिकाणी संस्थेने स्वच्छता मोहीम राबवून तेथे आकर्षक पेंटींग केली आहे. सध्या संस्था इतवारी रेल्वेस्थानकावर अभियान राबवून तेथे आकर्षक कलाकृती साकारत आहे. (प्रतिनिधी)

सर्व वयोगटातील व्यक्तींचा समावेश
आय क्लीन नागपूर संस्थेत सर्व वयोगटातील व्यक्तींचा सहभाग वाढत आहे. यात विद्यार्थी, डॉक्टर, इंजिनिअर, चार्टर्ड अकाऊंटंट, महिला आदींचा समावेश आहे. रविवारी इतवारी रेल्वेस्थानकावरील उपक्रमात संस्थेच्या प्रकल्प प्रमुख वंदना मुजुमदार, संदीप अग्रवाल, ऋषभ पात्रे, शुभम सोनी, जयदीप मोघे, अजिंक्य टोपरे, अश्विनी टोपरे, शार्दुल खापेकर, अथर्व देशमुख, समीर चतुर्वेदी, प्रियंका मोरे, प्राची सोनारे, रितु अग्रवाल, अंजली उंटवाले, निशी उंटवाले, अजय कांबळे, अहान कान्हेरे, उमे खलीमा मलीक, सलोनी ढाकोले, रुचिका राजगरीया यांनी सहभाग नोंदविला. हा उपक्रम दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमितकुमार अग्रवाल, ‘सिनिअर डीसीएम’ अर्जुन सिबल, ‘सिनिअर डीओएम’ सचिन शर्मा, अमित तिवारी, स्टेशन व्यवस्थापक कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असूनउपक्रमाचे प्रवाशांकडून कौतुक होत आहे.शहराबाहेर स्वच्छता अभियान लवकरच आय क्लीन नागपूर या संस्थेच्या उपक्रमाला ग्रामीण भागातून मागणी होत आहे. सध्या संस्थेचे जवळपास १२५ सदस्य झाले आहेत. नागरिक या उपक्रमात फेसबुकवरील आय क्लीन नागपूर या पेजवर जॉईन होऊ शकतात. लवकरच खापा, सावनेर अशा मागणी आलेल्या भागात जाऊन स्वच्छतेचा संदेश देण्याचा संस्थेचा मानस असल्याचे संस्थेच्या वंदना मुजुमदार यांनी सांगितले.

कुठलेच शुल्क नाही
एखाद्या संस्थेत किंवा परिसरात अस्वच्छता असल्यास आणि तेथील नागरिकांनी आय क्लीन नागपूर संस्थेशी संपर्क साधल्यास ही संस्था कुठलेच शुल्क न आकारता तेथे सफाई अभियान राबवून स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या कलाकृती साकारते. फक्त संस्थेला रंगरंगोटीचे साहित्य उपलब्ध करून देणे ही संबंधिताची जबाबदारी राहते. त्यामुळे भविष्यात संस्थेच्या या कार्याचा झपाट्याने विस्तार होऊन संपूर्ण नागपुरात हे अभियान राबविल्या जाण्याची शक्यता आहे. यामुळे शहरातील नेहमी अस्वच्छ राहत असलेल्या परिसराचा चेहरामोहरा बदलण्याची शक्यता आहे.

Web Title: Cleanliness of beautiful artwork

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.