नागपूर रेल्वेस्थानकावर उपाशीपोटी कर्मचाऱ्यांचे सफाई अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 11:00 PM2018-03-16T23:00:55+5:302018-03-16T23:01:08+5:30
रेल्वे प्रशासन रेल्वेगाड्या, रेल्वेस्थानकावर स्वच्छता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. परंतु कंत्राटीकरणाच्या धोरणामुळे नागपूर रेल्वेस्थानकावरील सफाई कर्मचाऱ्यांना मागील अडीच महिन्यांपासून उपाशीपोटी राहून सफाईचे अभियान राबविण्याची पाळी आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे प्रशासन रेल्वेगाड्या, रेल्वेस्थानकावर स्वच्छता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. परंतु कंत्राटीकरणाच्या धोरणामुळे नागपूर रेल्वेस्थानकावरील सफाई कर्मचाऱ्यांना मागील अडीच महिन्यांपासून उपाशीपोटी राहून सफाईचे अभियान राबविण्याची पाळी आली आहे. जुना कंत्राटदार दीड महिन्याचे वेतन बुडवून पळाला असून नव्या कंत्राटदारानेही चालू महिन्याचे वेतन न दिल्यामुळे सफाई कर्मचारी अडचणीत आले आहेत.
नागपूर रेल्वेस्थानकावर १५ फेब्रुवारी २०१८ पर्यंत सफाईचे कंत्राट एस. के. वली नावाच्या कंत्राटदाराला देण्यात आले होते. परंतु या कंत्राटदाराने सफाई कर्मचाऱ्यांचे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे असे मिळून दीड महिन्याचे वेतन न देताच पळ काढला. त्यानंतर सफाईचे कंत्राट कोटेशननुसार दुबे नावाच्या व्यक्तीला देण्यात आले. त्यानेही सफाई कर्मचाºयांच्या वेतनाची तारीख १० मार्च असताना १५ मार्च अखेर वेतन दिलेले नाही. यामुळे रेल्वेस्थानकावरील सफाई कर्मचारी प्रचंड अडचणीत सापडले आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा असा यक्षप्रश्न त्यांना पडला आहे. उपाशीपोटी रेल्वेस्थानकाची सफाई त्यांना करावी लागत आहे. रेल्वे प्रशासनाने स्वच्छतेची जबाबदारी कंत्राटदारांच्या हाती सोपविल्यापासून सातत्याने सफाई कर्मचाऱ्यांना केलेल्या कामाचे वेतन मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. आता तर अडीच महिन्याचे वेतन रखडल्यामुळे जगण्याचा गंभीर प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या नेहमीच्या कटकटीतून कायमचा तोडगा काढून सफाई कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची मागणी सफाई कर्मचारी करीत आहेत.
‘पुढील आठवड्यात वेतन देऊ’
जुन्या कंत्राटदाराने सफाई कर्मचाऱ्यांचे दीड महिन्याचे वेतन दिलेले नाही. सफाई कर्मचाऱ्यांची अडचण आम्ही समजु शकतो. त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही रेल्वेच्यावतीने पुढील आठवड्यापर्यंत त्यांचे रखडलेले वेतन देऊ. ही रक्कम संबंधित कंत्राटदाराच्या अनामत रक्कमेतून वसूल करण्यात येईल.’
-कुश किशोर मिश्र, ‘सिनिअर डीसीएम’, मध्य रेल्वे, नागपूर विभाग
आरोग्य निरीक्षकाची अरेरावी
आधीच वेतनामुळे त्रस्त झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांना रेल्वेस्थानकावरील आरोग्य निरीक्षक श्रद्धा देशपांडे या नाहक त्रास देत असल्याची माहिती सफाई कर्मचाऱ्यांनी दिली. सफाई कर्मचाºयांना काढून टाकण्याची धमकी देणे, कंत्राटदाराकडे खोट्या तक्रारी करणे असे उपद्याप या आरोग्य निरीक्षकाने चालविले असून याला आम्ही कंटाळलो आहोत, अशा शब्दात सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.