रात्रभर जागले मनपाचे स्वच्छता दूत

By admin | Published: October 24, 2015 03:10 AM2015-10-24T03:10:00+5:302015-10-24T03:10:00+5:30

दीक्षाभूमीवर लाखो भाविक आले. विविध संघटनांनी त्यांच्यासाठी नाश्ता, भोजन, पाणी आदीची व्यवस्था केली. तेवढाच कचराही तयार झाला.

Cleanliness messenger wakes up overnight | रात्रभर जागले मनपाचे स्वच्छता दूत

रात्रभर जागले मनपाचे स्वच्छता दूत

Next

दीक्षाभूमी परिसर केला स्वच्छ : २२५ टन कचरा केला गोळा
नागपूर : दीक्षाभूमीवर लाखो भाविक आले. विविध संघटनांनी त्यांच्यासाठी नाश्ता, भोजन, पाणी आदीची व्यवस्था केली. तेवढाच कचराही तयार झाला. मात्र, महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वच्छता दूताची भूमिका बजावत परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला. सफाई कर्मचारी गुरुवारी रात्री १२ ते शुक्रवारी सकाळी ६ पर्यंत जागले व सफाई अभियान राबवत संपूर्ण कचरा गोळा करून भांडेवाडी डम्पिंग यार्डपर्यंत पोहचविला. यामुळे लाखोंची गर्दी होऊनही दीक्षाभूमी परिसर दुसऱ्या दिवशी स्वच्छ असल्याचे पहायला मिळाले.
दीक्षाभूमी व परिसराच्या स्वच्छतेसाठी महापालिकेचे आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर यांनी एक कृती आराखडा तयार केला होता. त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. सफाईसाठी आरोग्य विभागातील एक हजार कर्मचारी, शहरातील कचरा उचलण्याचे कंत्राट देण्यात आलेली कंपनी कनक रिसोर्स मॅनेजमेंटचे २०० कर्मचारी या कामी लावण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांच्यासह सर्व झोनल अधिकारी तैनात होते. दीक्षाभूमी परिसर व दीक्षाभूमीकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर कचरा टाकण्यासाठी एकूण १५० ड्रम ठेवण्यात आले होते. खाली पडलेला कचरा सफाई कर्मचारी लागलीच उचलून ड्रममध्ये टाकत होते. ड्रममधील कचरा नेण्यासाठी ३५ गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. दिवसभर या गाड्या फिरत होत्या. गुरुवारी दिवसभर गोळा झालेला कचरा या गाड्यांनी भांडेवाडे डम्पिंग यार्डमध्ये पोहचविला. गुरुवारी एका दिवसात तब्बल २२५ टन कचरा गोळा करण्यात आला. तर गेल्या चार दिवसात एकूण सुमारे ३०० टन कचरा गोळा करण्यात आला. शुक्रवारी आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त नयना गुंडे यांनी यांनी स्वच्छतेची पाहणी केली व समाधान व्यक्त केले. (प्रतिनिधी)

शौचालयातही दुर्गंध नाही
दीक्षाभूमी परिसरात तात्पुरते ७१० शौचालय उभारण्यात आले होते. या शिवाय ५० सीटची व्यवस्था असलेले मोबाईल टॉयलेटही ठेवण्यात आले होते. या शौचालयाच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात आली. शौचालयाच्या स्वच्छतेसाठी स्वतंत्र कंत्राटदार नेमण्यात आला होता. शौचालयांमध्ये सतत फवारणी केली जात आहे की नाही याची वेळोवेळी तपासणी करण्यात आली. त्यामुळेच गुरुवारी लाखो अनुयायी येऊनही पसिरात दुर्गंध येत नव्हता.

दीक्षाभूमीवर लाखो अनुयायी येतात. मोठ्या प्रमाणात कचरा होतो. हा सर्व कचरा वेळीच उचलण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य विभागातील कर्मचारी, सफाई कामगारांनी विशेष परिश्रम घेतले. गुरुवारी रात्रभर व शुक्रवारीही दिवसभर कचरा उचलण्यात आला.
- डॉ. मिलिंद गणवीर,
आरोग्य उपसंचालक, मनपा

Web Title: Cleanliness messenger wakes up overnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.