दिवसभर उघाड, सायंकाळी धाेधाे बरसात; नागपुरात दाेन तासांत २४.६ मि.मी. पावसाची नाेंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2022 10:38 PM2022-07-26T22:38:19+5:302022-07-26T22:38:51+5:30
Nagpur News मंगळवारी दिवसभर पावसाने बऱ्यापैकी उघाड दिला. सायंकाळी ६ वाजेनंतर मात्र वातावरण बदलले आणि ढगांच्या गडगडाटासह जाेरदार पावसाने धडक दिली.
नागपूर : थाेडा वेळची रिमझिम वगळता मंगळवारी दिवसभर पावसाने बऱ्यापैकी उघाड दिला. सायंकाळी ६ वाजेनंतर मात्र वातावरण बदलले आणि ढगांच्या गडगडाटासह जाेरदार पावसाने धडक दिली. दीड दाेन तास झालेल्या सरींमुळे रात्री ८.३० वाजेपर्यंत २४.६ मि.मी. पावसाची नाेंद झाली. त्यानंतरही पाऊस सुरूच हाेता.
दाेन-चार दिवस पाऊस उसंत घेईल, असा दिलासादायक अंदाज हवामान विभागाने वर्तविला हाेता. मात्र, अचानक परिस्थितीत बदल झाला. उत्तर-पश्चिम अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला व बंगालच्या खाडीतही सायक्लाेनिक सर्क्युलेशन निर्माण झाले असल्याने आणि मान्सून ट्रफ दक्षिणेकडून उत्तरेकडे वळत असल्याने ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे काही दिवस विदर्भात मुसळधार पाऊस हाेण्याचीही शक्यता विभागाने व्यक्त केली आहे.
दरम्यान साेमवारी वर्धा, चंद्रपूर, गडचिराेलीत जाेरदार पावसाने धडक दिली. वर्ध्यात मंगळवारीही पावसाचा जाेर कायम हाेता. सकाळी ८.३० वाजेपर्यंत १०४.५ मि.मी. पाऊस वर्ध्यात नाेंदविला गेला तर दिवसभरात ४४ मि.मी. पाऊस झाला. चंद्रपूरला रात्री २८.८ मि.मी. पाऊस झाला; पण मंगळवारी शांतता हाेती. यवतमाळला रात्री ४७ मि.मी. पाऊस झाला; पण दिवसा उघडीप मिळाली. गाेंदिया येथे दिवसभरात २० मि.मी. पावसाची नाेंद झाली.
नागपूरला सायंकाळी वातावरण बदलले व काळ्या ढगांनी आकाशात गर्दी केली. ७ वाजेच्या सुमारास जाेरदार पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. दाेन तास धाेधाे बरसला. त्यामुळे अनेक भागांतील रस्ते व काही वस्त्या पुन्हा जलमय झाल्या. नरेंद्रनगर व मनीषनगर रेल्वे अंडरब्रिजखाली पाणी जमा झाले. मेडिकल चाैक, पडाेळेनगर, त्रिमूर्तीनगर, काचिपुरा आदी भागातही पाणी जमा झाल्याची माहिती आहे.