विदर्भात पाच दिवस उघाडही अन् ढगाळही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2022 08:26 PM2022-08-16T20:26:00+5:302022-08-16T20:28:19+5:30
पुढचे किमान पाच दिवस विदर्भात दिलासादायक उघाड मिळण्याचा अंदाज आहे. मात्र, मध्यमध्ये ढगाळ वातावरण राहील व विजांच्या कडकडाटासह हलका पाऊसही हाेण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
नागपूर : मान्सून ट्रफ सध्या सामान्य स्थितीच्या दक्षिणेकडे असून, पुढचे तीन दिवस त्याच स्थितीत राहणार असल्याने पुढचे किमान पाच दिवस विदर्भात दिलासादायक उघाड मिळण्याचा अंदाज आहे. मात्र, मध्यमध्ये ढगाळ वातावरण राहील व विजांच्या कडकडाटासह हलका पाऊसही हाेण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, मंगळवारी दिवसभर पावसाने उघडीप दिली व अनेक भागात सूर्यदर्शनही झाले.
११ ऑगस्टपासून विदर्भात पुन्हा पाऊस सक्रिय झाला हाेता. १४ व १५ ऑगस्टला पावसाची तीव्रता अधिक हाेती. नागपूरसह सर्वत्र आकाशात काळ्या ढगांची गर्दी व पावसाची रिपरिप सुरू हाेती. गडचिराेली आणि गाेंदिया जिल्ह्यांत पावसाची तीव्रता अधिक हाेती. साेमवारी रात्री गडचिराेलीत काेरची येथे सर्वाधिक ६७.७ मि.मी. पावसाची नाेंद झाली. शहरातही २७.४ मि.मी. पाऊस झाला. गाेंदिया शहरात ५५ मि.मी. पावसाची नाेंद करण्यात आली. मंगळवारी सकाळपर्यंत नागपुरात ९.४, वर्धा १६.८, अकाेला १६.९, अमरावती १४, ब्रम्हपुरी २३.७, चंद्रपूर येथे १२.६ मि.मी. पावसाची नाेंद करण्यात आली. १६ ऑगस्टला मात्र काेणत्याही शहरात पावसाची नाेंद झाली नाही. नागपूरला सकाळी ढगाळ वातावरण हाेते; पण नंतर आकाश साफ झाले व सूर्यही तापला. इतर सर्वच भागात कमीअधिक हीच परिस्थिती हाेती. पाऊस थांबल्याने सर्वच शहराचे तापमान ४ ते ५ अंशाने वाढले आहे. नागपूरला ३०.२ अंश तापमानाची नाेंद करण्यात आली.
दरम्यान, आतापर्यंत बहुतेक भागात पावसाने संपूर्ण मान्सूनची सरासरी गाठली आहे. १ जून ते १६ ऑगस्टपर्यंत विदर्भात ९४३.७ मि.मी. पाऊस झाला असून, ताे सरासरीपेक्षा ४५ टक्के अधिक आहे. मराठवाड्यात ४६ टक्के, तर मध्य महाराष्ट्रात ३२ टक्के अधिक पाऊस झाला आहे. नागपूरला आतापर्यंत १०३० मि.मी. पाऊस झाला, जाे सरासरीपेक्षा ७१ टक्के अधिक आहे. वर्धा ९७९.१ मि.मी. पाऊस झाला, जाे ८१ टक्के अधिक आहे. गडचिराेलीत १२४९.३ मि.मी. पाऊस झाला असून, ताे ५४ टक्के अधिक आहे, तर चंद्रपुरात १०१७.३ मि.मी.सह ५० टक्के अधिक पाऊस झाला आहे. याशिवाय भंडारा ४१ टक्के, यवतमाळ ४६ टक्के, गाेंदिया २७ टक्के, तर अमरावतीत १७ टक्के अधिक पाऊस झाला. केवळ अकाेला येथे सरासरीपेक्षा ४ टक्के कमी पाऊस झाला आहे.