जयताळ्यातील झोपडपट्टीधारकांना स्थायी भाडेपट्टा वाटपाचा मार्ग मोकळा

By योगेश पांडे | Published: August 22, 2024 10:31 PM2024-08-22T22:31:54+5:302024-08-22T22:32:06+5:30

शहरातील इतर भागांत झोपडपट्टीधारकांना मालकीहक्क पट्टेवाटप झाले होते.

Clear the way for allotment of permanent leases to slum dwellers in Jaytala | जयताळ्यातील झोपडपट्टीधारकांना स्थायी भाडेपट्टा वाटपाचा मार्ग मोकळा

जयताळ्यातील झोपडपट्टीधारकांना स्थायी भाडेपट्टा वाटपाचा मार्ग मोकळा

नागपूर : जयताळ्यातील रमाबाई आंबेडकर नगर व जुनी वस्ती येथील झोपडपट्टीधारकांना स्थायी भाडेपट्टा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे शेकडो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. यासंदर्भात बऱ्याच काळापासून सरकारदरबारी मागणी करण्यात येत होती. रमाबाई आंबेडकर नगर व जुनी वस्ती येथील सरकारी जागेवर अनेक वर्षांपासून झोपडपट्टी वसलेली आहे. रमाबाई आंबेडकर नगरच्या जमिनीची मालकी राज्य शासनाकडे आहे, तर जुनी वस्तीची मालकी सरकारी तसेच खाजगी स्वरुपाची आहे.

शहरातील इतर भागांत झोपडपट्टीधारकांना मालकीहक्क पट्टेवाटप झाले होते. मात्र या दोन्ही ठिकाणी नागरिकांना कुठलाच दिलासा मिळाला नव्हता. भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष पारेंद्र पटले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा मुद्दा मांडला होता. त्यानुसार याबाबत प्रशासकीय नोंदी तपासण्याचे निर्देश मनपाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. सर्वांसाठी घरे २०२२ या धोरणानुसार शासनाने २०१९ साली शासन निर्णय जारी केला होता. त्यानुसार महानगरपालिकेच्या क्षेत्रातील शासकीय मालकीच्या जमिनीवरील अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण नियमानुकुल करण्याची जबाबदारी संबंधीत शासकीय विभागाची आहे.

शासनाच्या जागेवरील नागरीकांना अतिक्रमित जागेकरीता भाडेपट्टा देण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयाकडून होणे अपेक्षित आहे. तर खाजगी जमिनीवरील पात्र झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप करण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. त्यानुसार ही प्रक्रिया मनपाच्या नगररचना विभागाच्या सहायक संचालकांकडून पूर्ण होणे गरजेचे आहे. संबंधित झोपडपट्टयांची जागा मनपाकडून संपादित झाल्यावर १ जानेवारी २०११ च्या अगोदरच्या अतिक्रमणधारकांना स्थायी भाडेपट्टा देण्याबाबत मनपाकडून प्रक्रिया करण्यात येईल, असे मनपाचे उपायुक्त मिलींद मेश्राम यांनी पत्रातून स्पष्ट केले आहे.

Web Title: Clear the way for allotment of permanent leases to slum dwellers in Jaytala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.