अमरावती मेडिकल कॉलेजचा मार्ग मोकळा; वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2022 07:56 PM2022-03-26T19:56:11+5:302022-03-26T19:58:24+5:30
Nagpur News वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी नांदगाव पेठ येथील १८.५३ हेक्टर जागेवर मेडिकल उभारण्याचा सूचना केल्या आहेत. कॉलेज उभारण्यासाठी चार सदस्यीय समितीही स्थापन केली आहे.
नागपूर : बहुप्रतीक्षित अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) स्वप्न पूर्ण होताना दिसून येत आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी नांदगाव पेठ येथील १८.५३ हेक्टर जागेवर मेडिकल उभारण्याचा सूचना केल्या आहेत. कॉलेज उभारण्यासाठी चार सदस्यीय समितीही स्थापन केली आहे.
अमरावती येथे मेडिकल कॉलेज स्थापन करण्याची मागणी २०१७ पासूनची आहे. २०१९ मध्ये वैद्यकीय शिक्षण संशोधन व संचालनालयाने (डीएमईआर) समिती स्थापन केली. दरम्यानच्या काळात जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी मेडिकल कॉलेजबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजीत पवार व वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख यांच्याशी चर्चा केली. परिणामी, जानेवारी, २०२१ रोजी हा विषय कॅबिनेटपुढे येऊन सकारात्मक चर्चा झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही अमरावती मेडिकलसाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली. आता जागेचाही प्रश्न सुटल्याने मेडिकल कॉलेजचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र आहे.
- या जागेवर होणार कॉलेज
अमरावती येथील ‘नांदगाव पेठ’ भाग-२ मधील गट क्र. ३८१मधील २ हेक्टर, गट क्र. ३८२ मधील १३.५३ हेक्टर, गट क्र. ३८३ मधील १३.८८ हेक्टर तर गट क्र. ३८२ला लागून असलेली ३ हेक्टर अशी एकूण १८.५३ हेक्टर शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- अशी आहे तज्ज्ञ समिती
अमरावती मेडिकल कॉलेजच्या स्थापनेसाठी समन्वय अधिकारी व तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली. यात अध्यक्ष म्हणून नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. संजय पराते, सदस्य म्हणून नागपूर मेडिकलच्या शरीररचनाशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ.तारकेश्वर गोडघाटे, नागपूर मेडिकलच्या औषधवैद्यकशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.व्ही.आय. खंडाईत व नोडल अधिकारी डॉ.विजय शेगोकार आहेत, तर प्रशासकीय कामकाजात मदत करण्यासाठी नागपूर मेडिकलचे प्रशासकीय अधिकारी संजीव देशमुख यांची नेमणूक करण्यात आली आहे.
- एनएमसी’च्या निकषानुसार जागेची पाहणी
‘डीएमईआर’ने अमरावती मेडिकलचा प्रस्तावित जागेची पाहणी करण्याचा सूचना या समितीला दिल्या आहेत. सोबतच ‘राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगा’च्या (एनएमसी) निकषानुसार प्रस्तावित जागा सुयोग्य आहे किंवा नाही, याचा अहवाल सादर करण्याचाही सूचना आहेत.