डेबिट कार्डची माहिती घेऊन अख्ख्या परिवारातील सदस्याचे बँक खाते साफ केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 11:14 AM2020-06-03T11:14:09+5:302020-06-03T11:17:30+5:30
स्वत:ला फायनान्स कंपनीचा अधिकारी असल्याचे सांगून एका विद्यार्थ्याकडून डेबिट कार्डचे डिटेल्स विचारल्यानंतर एका सायबर गुन्हेगाराने तो विद्यार्थी, त्याचे आई-वडील आणि भावाच्या खात्यातून तब्बल ७ लाख ४४ हजार ७८५ रुपये लंपास केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वत:ला फायनान्स कंपनीचा अधिकारी असल्याचे सांगून एका विद्यार्थ्याकडून डेबिट कार्डचे डिटेल्स विचारल्यानंतर एका सायबर गुन्हेगाराने तो विद्यार्थी, त्याचे आई-वडील आणि भावाच्या खात्यातून तब्बल ७ लाख ४४ हजार ७८५ रुपये लंपास केले. १९ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर दरम्यान घडलेल्या या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर अंबाझरी पोलिसांनी सोमवारी आयटी अॅक्टनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
अमेय प्रशांत देवगुप्ता (वय २२) असे तक्रार करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो शिक्षण घेत आहे. अंबाझरीतील वर्मा ले-आऊटमध्ये राहणाऱ्या अमेयच्या मोबाईलवर १९ सप्टेंबर २०१९ ला सुमितकुमार अग्रवाल नामक आरोपीचा फोन आला. मी बजाज फायनान्स कंपनीकडून बोलतो. माझे नाव सुमित कुमार अग्रवाल असून तुमच्या लॅपटॉपची ४,३०३ रुपयांची किस्त बाकी आहे. ती तातडीने जमा करा अन्यथा तुम्हाला व्याज भरावे लागेल, असा धाक दाखवून आरोपीने अमेयला त्याच्या डेबिट कार्डचे डिटेल्स विचारले. त्यानंतर त्या डेबिट कार्डच्या आधारे अमेयचे वडील प्रशांत गुप्ता, आई श्रीवल्ली देवगुप्ता आणि भाऊ साईअक्षय देवगुप्ता यांच्या बँक खात्यातून ७ लाख ४४ हजार ७७५ रुपये काढून घेतले. ही खळबळजनक बाब लक्षात आल्यानंतर देवगुप्ता परिवाराने पोलिसांकडे धाव घेतली. प्रकरण सायबर शाखेत गेले. सायबर शाखेने प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर अंबाझरी पोलिसांकडे सोमवारी प्रकरण सोपविले.
सहायक पोलीस निरीक्षक अरविंद घोडके यांनी सोमवारी अमेयची तक्रार नोंदवून घेतली आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याचा दुरूपयोग केल्याच्या कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
भविष्यातील योजनांवर पाणी
अमेयचे वडील प्रशांत गुप्ता शासकीय नोकरदार होते. ते काही महिन्यांपूर्वी निवृत्त झाले. त्यांनी निवृत्तीनंतर मिळालेल्या रकमेतील पाच लाख रुपये आपल्या स्वत:च्या खात्यात ठेवले. दोन लाख रुपये पत्नीच्या खात्यात टाकले तर दोन मुलांच्या खात्यात ४४ हजार रुपये जमा केले. या रकमेतून भविष्यातील योजनांची पूर्तता करण्याचे त्यांचे स्वप्न होते. अमेयच्या लहानशा चुकीमुळे या परिवारातील सर्व सदस्यांच्या खात्यातून सायबर गुन्हेगाराने रक्कम लंपास करून त्यांच्या योजनांवर पाणी फेरले आहे.