नागपुरातील नदी-नाल्यांची स्वच्छता १० जूनपर्यंत करा :स्थायी समिती अध्यक्षांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 12:21 AM2019-06-07T00:21:46+5:302019-06-07T00:22:28+5:30
पावसाळा जवळ आला आहे. परंतु अजूनही अनेक भागात नदी-नाल्यांची स्वच्छता झाली नसल्याच्या तक्रारी येत आहेत. १० जूनपर्यत शहरातील सर्व नदी-नाल्यांची स्वच्छता करण्याचे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी गुरुवारी स्वच्छता आढावा बैठकीत दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसाळा जवळ आला आहे. परंतु अजूनही अनेक भागात नदी-नाल्यांची स्वच्छता झाली नसल्याच्या तक्रारी येत आहेत. १० जूनपर्यत शहरातील सर्व नदी-नाल्यांची स्वच्छता करण्याचे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी गुरुवारी स्वच्छता आढावा बैठकीत दिले.
प्रशासनाने तयारी केली असली तरी अनेक भागात अडथळे येत आहेत. ते प्राधान्याने दूर करा व शेवटच्या टप्प्यात अधिक जोमाने काम करून अभियान १०० टक्के यशस्वी करण्याच्या सूचना केल्या. ५ मे पासून शहरातील नदी व नाले स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली आहे. सुरू असलेल्या कामाची पोहाणे यांच्याकडून पाहणी करण्यात येत आहे. अभियानाला गती देण्यासाठी त्यांनी महापालिका मुख्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी आरोग्य समिती सभापती मनोज चापले, नगरसेवक सुनील अग्रवाल, गोपीचंद कुमरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, नदी स्वच्छता अभियानाचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, एम.जी.कुकरेजा, आसाराम बोदेले, राजेश भूतकर, अनिरुद्ध चौगंजकर, राजेंद्र रहाटे, अविनाश बारहाते, अनिल नागदिवे, सहायक आयुक्त प्रकाश वराडे आदी उपस्थित होते.
नदी व नाले स्वच्छता अभियानाच्या कार्याचा झोननिहाय आढावा घेतला. नदी व नाले स्वच्छतेसाठी निर्धारित कालावधी जवळ येत असूनही अनेक भागात काम पूर्ण न झाल्याने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. नदी स्वच्छता अभियान अखेरच्या टप्प्यात आहे. परंतु शहरातील छोट्या नाल्यांची अद्याप सफाई झालेली नाही. काही नाल्याच्या शेजारी झोपडपट्ट्या असल्याने पावसाळ्यात या वस्त्यांत पाणी शिरण्याचा धोका आहे.अशा ठिकाणी तातडीने पाहणी करून स्वच्छता कार्य सुरू करण्याचे निर्देश प्रदीप पोहाणे यांनी दिले.
अशोक चौकातील नाग नदीच्या पात्रातील गाळ उपसण्यात आला असून या ठिकाणची सुमारे २५० टिप्पर माती हटविण्यासाठी आवश्यक ते मशीन उपलब्ध करून देऊन त्वरित काम पूर्ण करणे. तसेच संतोषी नगर भागामधील नाल्यामध्ये हिरव्या वनस्पतीचे साम्राज्य आहे. याभागातील वनस्पती काढून नाल्याचा प्रवाह मोकळा करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचेही निर्देश देण्यात आले.
संबंधित भागातील समस्या लक्षात घेता आज शुक्रवारी प्रदीप पोहाणे संबंधित प्रभागाचे नगरसेवक व अधिकाऱ्यांसोबत दौरा करून पाहणी करणार आहेत.
३१ पैकी २२ पोकलेन सुरू
नदी व नाले स्वच्छता अभियानासाठी ३१ पोकलेन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र यापैकी केवळ २२ सुरू असल्याचे निदर्शनास आले. उर्वरित पोकलेनची तपासणी करून त्यांना तातडीने कामात लावा, अनेक मशीनमध्ये बिघाड येत असल्याचे कारण दाखवून कामात हलगर्जीपणा करणाऱ्या मशीन मालकांवर कारवाई करण्याचे निर्देश पोहाणे यांनी दिले.