निबंधक कार्यालयातील लाचखाेर लिपिक अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 10:49 PM2021-06-03T22:49:10+5:302021-06-03T22:49:37+5:30
Clerk arrested for bribery खरेदी केलेल्या जागेचे पक्के विक्रीपत्र नाेंदणीकृत करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वरिष्ठ लिपिक महिलेस १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने अटक केली.
लाेकमत न्यूज नेटवर्क
हिंगणा : खरेदी केलेल्या जागेचे पक्के विक्रीपत्र नाेंदणीकृत करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वरिष्ठ लिपिक महिलेस १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने अटक केली. ही कारवाई हिंगणा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात गुरुवारी (दि. ३) दुपारी करण्यात आली.
अलका रवींद्र फेंडर (५२) असे अटक करण्यात आलेल्या आराेपी वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे. ती हिंगणा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात कार्यरत आहे. तक्रारकर्ते वंजारी लेआऊट, यशाेधरानगर, नागपूर येथील रहिवासी असून, व्यवसायाने वकील आहेत. त्यांच्या पक्षकाराला महाजनवाडी, वानाडाेंगरी (ता. हिंगणा) येथील माेकळी जागा खरेदी करावयाची असल्याने त्यांनी जागेचा साैदा केला हाेता. शिवाय, तक्रारकर्त्याने पक्षकाराकडून वकालतनामा लिहून घेतला असल्याने पक्षकाराचे खरेदीसंबंधीची कामे तेच बघायचे. दाेन्ही पक्षकारांनी नियमाप्रमाणे जागेच्या खरेदी-विक्रीचे दस्तऐवज तयार करून हिंगणा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सादर केले.
या जागेच्या पक्क्या विक्रीपत्र नाेंदणीसाठी अलका फेंडरने त्यांना २० हजार रुपयांची लाच मागितली. लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार नाेंदविली. ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची शहानिशा केली. तक्रारीत तथ्य आढळून येताच त्यांनी गुरुवारी दुपारी हिंगणा येथील दुय्यम निबंधक कार्यालय परिसरात सापळा रचला. दुसरीकडे तडजाेड करून या कामासाठी २० हजार रुपयांऐवजी १५ हजार रुपये घेण्यास फेंडरने सहमती दर्शविली. ही रक्कम स्वीकारत असताना दबा धरून बसलेल्या ‘एसीबी’च्या कर्मचाऱ्यांनी अलका फेंडर हिला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले व अटक केली. तिच्या विराेधात हिंगणा पाेलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नाेंदविण्यात आला.
या कारवाईमुळे दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ही कारवाई एसीबीच्या पाेलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, एसीबीचे अप्पर पाेलीस अधीक्षक मिलिंद ताेतरे यांच्या मार्गदर्शनात एसीबीच्या पाेलीस निरीक्षक संजीवनी थाेरात, हवालदार प्रवीण पडाेळे, शिपाई सराेज बुधे, रेखा यादव, गीता चाैधरी, प्रिया नेवरे, सिरसाट यांच्या पथकाने केली.