नागपूर मध्यवर्ती कारागृहात गांजा नेताना अडकला लिपीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 11:34 PM2018-03-01T23:34:13+5:302018-03-01T23:34:27+5:30
तुरुंगात गांजा नेताना एक लिपीक आढळल्याची घटना गुरुवारी घडली. या घटनेमुळे तुरुंग अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तुरुंगात गांजा नेताना एक लिपीक आढळल्याची घटना गुरुवारी घडली. या घटनेमुळे तुरुंग अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. विक्रम जगदीश गिरी (२८) रा. वानाडोंगरी, एमआयडीसी असे आरोपी लिपीकाचे नाव आहे. विक्रम तुरुंग परिसरातील कार्यालयात ‘ज्युडिशिअल क्लर्क’ पदावर कार्यरत होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तुरुंग अधिकाऱ्यांना तो कैद्यांना गांजा पुरवित असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे मुख्य प्रवेश द्वारावर विक्रमची अंगझडती घेण्यात आली. विक्रमजवळ टिफीन बॅग होती. सुरक्षा कर्मचारी धर्मराज नघाटे आणि दिनेश बारी यांनी टिफीन बॅगची तपासणी केली. त्यात त्यांना एका पुडीत गांजा आढळला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी याची सूचना त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. तुरुंगात लिपीकाजवळ गांजा आढळल्याच्या बातमीने तुरुंग अधिकाऱ्यात खळबळ उडाली. त्यांनी विक्रमची चौकशी केली. त्याने समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे धंतोली पोलिसांना सूचना देण्यात आली. धंतोली पोलिसांनी विक्रमला अटक करून त्याच्या जवळील सामानाची तपासणी केली. त्याच्या जवळ २३ ग्रॅम गांजा आढळळा. विक्रम तीन वर्षापूर्वी अनुकंपा तत्त्वावर नोकरीवर लागला होता. त्याचे वडील तुरुंगात सुरक्षा कर्मचारी होते. त्यांचा नोकरी दरम्यान मृत्यू झाला होता. त्यांचे जागी विक्रमला नोकरी मिळाली होती. विक्रमचे कुटुंबीय त्याला गांजा प्रकरणात गोवण्यात आल्याची शंका व्यक्त करीत आहेत. धंतोली पोलिसांनी मादक पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.
गांजामुळे पुन्हा तुरुंगाची चर्चा
या घटनेमुळे नागपूर तुरुंग पुन्हा चर्चेत आले आहे. एकेकाळी नागपूर तुरुंग देशभरात बदनाम होते. तुरुंगातील कर्मचारीच कैद्यांना मादक पदार्थांचा पुरवठा करीत होते. वेळोवेळी त्यांना पकडण्यातही आले होते. जेल ब्रेक प्रकरणानंतर येथील अराजकता पुढे आली होती. काही काळापासून तुरुंगाच्या कार्यशैलीत बरीच सुधारणा झाली आहे. तुरुंग अधिकाऱ्यांच्या सक्तीमुळे मादक पदार्थ तर दूर सामान्य वस्तूही आत नेणे शक्य नव्हते. गांजा प्रकरणामुळे पुन्हा सुरक्षा व्यवस्थेची समीक्षा करण्याची गरज निर्माण झाली आहे.
निनावी पत्रामुळे खुलासा
सूत्रानुसार तुरुंग अधिकाऱ्यांना नुकतेच एक निनावी पत्र मिळाले होते. त्यात कैद्यांना तुरुंगातील कर्मचाऱ्यांकडुन मादक पदार्थांचा पुरवठा होत असल्याचे सांगण्यात आले होते. या पत्राला तुरुंग अधिकाऱ्यांनी गंभीरपणे घेतले. त्यांनी संशयित कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे सुरू केले. त्यामुळेच विक्रम त्यांच्या हाती लागला.