मीटर बदलण्यासाठी लाच मागणाऱ्या महावितरणच्या लिपिकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2022 10:22 AM2022-08-04T10:22:36+5:302022-08-04T10:27:01+5:30
मीटर बदलण्याच्या बदल्यात पॅनल बसविणाऱ्या कंत्राटदाराकडून वरगडे याने ५ हजार रुपयांची मागणी केली.
नागपूर : मीटर बसविण्याच्या बदल्यात दोन हजारांची लाच मागणाऱ्या महावितरणच्या लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. नीलेश पुंडलिकराव वरगडे (३६, उमरेड मार्ग) असे आरोपीचे नाव आहे.
तक्रारकर्ता सोलर पॅनल लावण्याचे काम करतात. त्यांनी नंदनवन संकुलातील एका ग्राहकाच्या घरी सोलर पॅनल लावले होते. सोलर पॅनल बसवल्यानंतर ग्राहकाच्या घरातून जुने मीटर काढून नवीन मीटर बसवले जाते. नवीन मीटरमध्ये ग्राहकांनी महावितरणकडून किती वीज वापरली आहे, याची माहिती मिळते. मीटर बदलण्याच्या बदल्यात पॅनल बसविणाऱ्या कंत्राटदाराकडून वरगडे याने ५ हजार रुपयांची मागणी केली. २ हजार रुपये घेण्याचे मान्य केले. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने ठेकेदाराने एसीबीकडे तक्रार केली.
एसीबीने वरगडेला पकडण्यासाठी रचलेल्या सापळ्यादरम्यान, वरगडेला संशय आला व त्याने ऐनवेळी पैसे घेण्यास नकार दिला. त्यानंतर एसीबीने वरगडे याला अटक करून लाच मागितल्याचा गुन्हा दाखल केला. एसीबीचे अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त अधीक्षक मधुकर गित्ते, उपअधीक्षक संदीप जगताप, निरीक्षक युनूस शेख, भागवत वानखेडे, पंकज घोडके, महेश सायलोकर, वकील, शारिक, सदानंद यांच्या पथकाने ही कारवाई केली.