मोबाईलवरील लिंक क्लिक केली, लाँड्री व्यावसायिकाची जमापुंजी गेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2023 09:46 PM2023-04-15T21:46:28+5:302023-04-15T21:47:12+5:30
Nagpur News आर्मी कँटोन्मेंटमधून बोलत असून, ५० कोट आणि ५० शर्ट पँट ड्रायक्लिन करायचे असल्याचे सांगून मोबाइलवर लिंक पाठवून पेमेंट करण्यासाठी लिंकवर क्लिक करण्यास सांगून सायबर गुन्हेगाराने लाँड्री व्यावसायिकाच्या खात्यातून ९९ हजार ९९९ रुपये काढून घेतले.
नागपूर : आर्मी कँटोन्मेंटमधून बोलत असून, ५० कोट आणि ५० शर्ट पँट ड्रायक्लिन करायचे असल्याचे सांगून मोबाइलवर लिंक पाठवून पेमेंट करण्यासाठी लिंकवर क्लिक करण्यास सांगून सायबर गुन्हेगाराने लाँड्री व्यावसायिकाच्या खात्यातून ९९ हजार ९९९ रुपये काढून घेतले. ही घटना जुनी कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत १९ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली आहे.
जुनी कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत लक्ष्मीकांत रामचंद्र जयस्वाल (५६, धोबीपुरा, राठी हॉस्पिटलजवळ) यांचा लाँड्रीचा व्यवसाय आहे. १९ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान त्यांच्या मोबाइलवर आरोपी मोबाइल क्रमांक ७८५५८९८६१९ व ८२९८६१०९७७ च्या अनोळखी व्यक्तीने फोन करून आपण आर्मी कँटोन्मेंटमधून बोलत असल्याचे सांगितले. आपल्याला ५० कोट, ५० शर्ट व पँट ड्रायक्लिन करायचे असल्याची बतावणी आरोपीने केली. आरोपीने जयस्वाल यांना मोबाइलवर लिंक पाठविली आणि पेमेंट करण्यासाठी लिंकवर क्लिक करण्यास सांगितले. जयस्वाल यांनी लिंकवर क्लिक करताच त्यांच्या बँक खात्यातून ९९ हजार ९९९ रुपये आरोपी सायबर गुन्हेगाराने काढून घेत त्यांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केली. जयस्वाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून जुनी कामठी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी आरोपीविरुद्ध कलम ४२०, ६६(१), (डी), आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
................