मानवी चेहऱ्यापलिकडील संवेदनांचे क्लिक : इसा मोस्त्राचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 09:17 PM2019-12-14T21:17:39+5:302019-12-14T21:19:53+5:30

बोलके भाव एका क्लिकमध्ये टिपणे खरतर छायाचित्रकारांचे कसब म्हणावे. पण काही ‘क्लिक’ इतके बोलके असतात की त्यातून चेहऱ्यावरील भावनाच नाही तर भावनांपलिकडे व्यक्तीच्या जीवनाचे गूढ रहस्यही उलगडून जातात.

Clicks of sensations beyond the human face: organizing Isa Mostra | मानवी चेहऱ्यापलिकडील संवेदनांचे क्लिक : इसा मोस्त्राचे आयोजन

मानवी चेहऱ्यापलिकडील संवेदनांचे क्लिक : इसा मोस्त्राचे आयोजन

Next
ठळक मुद्देदर्डा आर्ट गॅलरीत आंतरराष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मानवी चेहऱ्यांवरील भाव अनेक अर्थाने बोलके असतात. हे बोलके भाव एका क्लिकमध्ये टिपणे खरतर छायाचित्रकारांचे कसब म्हणावे. पण काही ‘क्लिक’ इतके बोलके असतात की त्यातून चेहऱ्यावरील भावनाच नाही तर भावनांपलिकडे व्यक्तीच्या जीवनाचे गूढ रहस्यही उलगडून जातात. कधी ते एका क्षणात सापडतात तर कधी तो एक क्षण टिपण्यासाठी छायाचित्रकारांना बराच काळ वाट पहावी लागते. यातूनच त्या छायाचित्रकारामधले कौशल्य दिसून येते. अशा कौशल्यपूर्ण छायाचित्रकारांचे संवेदना उलगडणारे छायाचित्र प्रदर्शन रसिकांचे व तरुण छायाचित्रकारांचे लक्ष वेधून घेत आहे.
हे दोन दिवसीय स्पर्धा व प्रदर्शन लोकमत भवन स्थिती जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी येथे लावण्यात आले आहे. इसा मोस्त्राच्यावतीने लागलेल्या या पोर्ट्रेटच्या (व्यक्तिचित्र) आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे शनिवारी प्रसिद्ध छायाचित्रकार ललित विकमशी व किशोर मसराम यांच्या उपस्थितीत औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयोजनातील अनुराग भट्टाचार्य, राजस वैद्य, मिहिर भट्टाचार्य, चेतना बोरकर, डॉ. अमित दत्ता व राधे ढोलके आदी प्रामुख्याने उपस्थित होते. ललित विकमशी म्हणाले, फोटोग्राफी आणि पेंटिंग एकाच स्तराच्या कला आहेत. तंत्रज्ञानामुळे फोटोग्राफीच्या कौशल्यात बराच फरक पडला आहे, मात्र शेवटी कलात्मकतेला महत्त्व असते. व्यक्तिचित्रात चेहरा व शरीराच्या भागांचे बोलके चित्रण असते. पण या चेहऱ्यावरील भावनांपलिकडे असलेली कथा त्या एका क्लिकमध्ये उलगडली की ते चित्र श्रेष्ठ ठरते. छायाचित्रकारांनी या कथा शोधाव्या आणि त्यांच्या छायाचित्रांमधून मांडाव्या, असे आवाहन त्यांनी केले.
इसा मोस्त्राच्या या छायाचित्र प्रदर्शनात भारतासह स्पेन, बल्गेरिया, ओमान, रियाद आदी देशातील छायाचित्रकारांच्या ११८ छायाचित्रांचा समावेश आहे. डॉ. दत्ता यांनी सांगितले, प्रदर्शनासाठी ४०० पेक्षा अधिक प्रवेशिका आल्या होत्या, त्यापैकी ७८ छायाचित्रकारांच्या छायाचित्रांचा समावेश करण्यात आला. परीक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार बांगलादेशचे जीएमबी आकाश यांनी सर्वोत्तम छायाचित्रांची निवड केली आहे. प्रदर्शनांतर्गत शनिवारी सकाळी फोटो मॅरेथॉन घेण्यात आली. यामध्ये ४० उदयोन्मुख छायाचित्रकारांनी रस्त्यावर पोर्ट्रेट काढले. या पोर्ट्रेटचाही प्रदर्शनात समावेश करण्यात आल्याचे डॉ. दत्ता यांनी सांगितले. हे प्रदर्शन अनेक अर्थाने बोलके आहे. मानवी चेहऱ्यांमधून अनेक भाषा, धर्म व संस्कृती व विविधतेने नटलेल्या भारताचे, येथील सण उत्सवांचे, माणसांचे, पारंपरिकतेचे आणि आधुनिकतेसोबत येथील वेदना व संवेदनांचेही दर्शन प्रदर्शनातून होते, जे नव्या कलावंतांसाठी व रसिकांसाठीही अतुलनीय आहे.

Web Title: Clicks of sensations beyond the human face: organizing Isa Mostra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.