वातावरण बदलामुळे ग्रामीण भागात आजाराचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:07 AM2021-04-10T04:07:41+5:302021-04-10T04:07:41+5:30
मौदा : एकीकडे ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे वातावरणात झालेल्या बदलामुळे ताप, अंगदुखी, लुजमोशन यांसारख्या आजाराने ...
मौदा : एकीकडे ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे वातावरणात झालेल्या बदलामुळे ताप, अंगदुखी, लुजमोशन यांसारख्या आजाराने डोके वर काढले आहे. त्यामुळे मौदा शहर आणि तालुक्यातील खासगी दवाखान्यात उपचारासाठी रुग्णांची गर्दी वाढली आहे. अनेक दवाखान्यात रुग्ण भरतीकरिता बेड कमी पडत आहेत, तर कोरोनाच्या भीतीमुळे अनेक रुग्ण कोरोना चाचणी करून घेत आहेत.
रुग्ण संख्या वाढल्यामुळे खासगी दवाखान्यात रुग्णांची गर्दी लक्षात घेता कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून रुग्णसेवा सुरू आहे. याबाबत मौदा येथील डॉ. आशिष सावरकर यांना विचारणा केली असता मागील काही दिवसात वातावरणात झालेल्या बदलांमुळे वाढलेले तापमान यामुळे ताप, अंगदुखी, डी-हायड्रेशनचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. पाणी भरपूर पाणी प्यावे, उन्हात बाहेर निघताना स्कार्फ, दुपट्टा बांधून निघावे, लहान मुले उन्हात फिरणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. उन्हातून आल्यानंतर कुलर किंवा एसी रुममध्ये बसू नये. स्वच्छता राखणे, विशेष म्हणजे प्रत्येकाने मास्क वापरावा, वारंवार हात धुवावे. डॉक्टरच्या सल्ल्यानेच औषध उपचार करावा. बाहेरचे खाणे टाळावे. ही काळजी घेतल्यास या व्हायरलवर आळा घालता येईल, अशी माहिती डॉ. सावरकर यांनी दिली.