गिर्यारोहणावर केवळ पुरुषांचीच मक्तेदारी नाही : चेतना साहू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 11:43 AM2023-06-21T11:43:18+5:302023-06-21T11:44:13+5:30
लोकमतसोबत बोलताना त्यांनी गिर्यारोहणाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला
नागपूर : गिर्यारोहणामध्ये महिलांनी केलेली उल्लेखनीय कामगिरी बघता या प्रकारवरची पुरुषांची मक्तेदारी आता संपुष्टात आली असल्याचे मत प्रसिद्ध गिर्यारोहक चेतना साहू यांनी व्यक्त केले.
वर्धेवरून एक कार्यक्रम आटोपून नागपूरला आल्यानंतर त्यांनी काही वेळ शहरात व्यतीत केला. यावेळी लोकमतसोबत बोलताना त्यांनी गिर्यारोहणाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, जगण्याची कला शिकविण्याचे यशस्वी माध्यम म्हणजे गिर्यारोहण. कारण कुढलीही चढाई करताना तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रत्येक संकटावर मात करून पुढे जात राहावे लागते. आयुष्य सुद्धा असेच असते. शिवाय एक ध्येय डोळ्यांपुढे ठेवून गिर्यारोहण केले जाते. दैनंदिन जीवनातसुद्धा ध्येयनिश्चितीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आयुष्यात काय मिळवायचे आहे हे जर स्पष्ट असले तर त्यादृष्टीने माणूस एक एक पाऊल पुढे टाकतो. त्यामुळे आयुष्य आणि गिर्यारोहण या दोन्हीमध्ये समर्पणाला खूप महत्त्व आहे.
बच्छेंद्रीपालकडून मिळाली प्रेरणा
१९८५ साली चेतना साहू यांनी गिर्यारोहणाला सुरुवात केली. वर्षभराआधी त्यांनी बच्छेंद्रीपाल यांच्याविषयी ऐकले होते. माऊंट एव्हरेस्टवर सर्वात प्रथम पाऊल ठेवणारी महिला म्हणून बच्छेंद्रीपाल यांची ओळख आहे. चेतना यांच्यासाठी त्या प्रेरणास्रोत ठरल्या. त्यानंतर नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटनरिंग, उत्तरकाशी येथे त्यांनी गिर्यारोहणाचे धडे गिरवायला सुरुवात केली.
माउंट एव्हरेस्ट सर करणारे सर्वात जास्त वयाचे दाम्पत्य
चेतना यांचे पती प्रदीप साहूसुद्धा गिर्यारोहक होते. २०१६ साली चेतना आणि त्यांच्या पतीने पन्नासाव्या वर्षी माऊंट एव्हरेस्टची यशस्वी चढाई केली होती. अशी कामगिरी करणारे ते सर्वात जास्त वयाचे दाम्पत्य ठरले. ही मोहीम फत्ते करून परतत असताना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे चेतना यांची प्रकृती चांगलीच बिघडली. यातून सावरण्यासाठी त्यांना तब्बल अडीच वर्षे लागली. प्रदीप यांच्या मृत्यूनंतरही त्यांनी गिर्यारोहण करणे सुरूच ठेवले. ट्रान्स हिमालय गिर्यारोहणासाठी त्यांना बच्छेंद्रीपाल आणि काही पन्नाशीतल्या महिलांसोबत नव्या मोहिमेवर जाण्याची संधी मिळाली. या तुकडीने पाच महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर पूर्व ते पश्चिम हिमालयाची ४९०० किलोमीटरची उंची पार केली होती. मोहिमेत सहभागी असणाऱ्या सर्व महिलांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सत्कारसुद्धा करण्यात आला.