ऑडिओ क्लीप, ड्रग्ज अन् सेक्स रॅकेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2022 07:45 AM2022-04-06T07:45:00+5:302022-04-06T07:45:01+5:30
Nagpur News नागपुरात एका अॉडिओ क्लीपने खळबळ उडवून दिली असून, त्यातून ड्र्ग्जसह अनेक गुन्ह्यांचा खुलासा समोर येत आहे.
नरेश डोंगरे ।
नागपूर - एका गुन्ह्याचा तपास करताना दुसरा गुन्हा उघड व्हावा. त्यातून तिसऱ्या गुन्ह्याचे धागे मिळावे अन् नंतर चवथ्या, पाचव्या... अशी गुन्ह्यांची धक्कादायक मालिकाच उजेडात यावी, असा काहीसा प्रकार नागपूर पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झाला आहे. सिनेस्टाईल असे एका पेक्षा एक धक्कादायक खुलासे होत असल्याने पोलीसही चक्रावले आहेत. त्याचमुळे गुंतागुंतीच्या या प्रकरणातील सर्वच धागेदोरे उकलण्यासाठी पोलीस जोमाने कामी लागले आहेत.
चार दिवसांपूर्वी एका ऑडिओ क्लीपने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडवून दिली. ड्रग्ज अन् सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन टोळ्यापैकी एका म्होरक्याच्या गर्लफ्रेण्डवर दुसऱ्या टोळीने हात मारण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्यातील खुन्नस देणाऱ्या दोन क्लीप सार्वजनिक झाल्या. नागपूर पासून दगडी चाळीपर्यंत (मुंबई)च्या अनेक गुंडांची नावे घेऊन हे गुंड एकमेकांना धमक्या देत होते. त्यातून एका तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याचे आणि ड्रग्ज (गांजा) तस्करीत गुंतलेल्याची माहिती पोलिसांनी ताडली. तातडीने हे गुंड हाती लागले नाही तर सामुहिक बलात्कार, अपहरण आणि हत्येसारखा गंभीर गुन्हा घडू शकतो, याचा अंदाज पोलीस आयुक्तांनी बांधला अन् त्यानुसार कारवाईसाठी चक्र फिरवण्यात आले. सलग ३६ तासाच्या कारवाईत एका टोळीतील पाच तर दुसऱ्या टोळीतील ४ असे ९ खतरनाक गुन्हेगार पोलिसांनी जेरबंद केले. त्यात एक पोलीस उपनिरीक्षकही आहे. दरम्यान, जिच्यामुळे या दोन टोळ्या एकमेकांच्या जिवावर उठल्या ‘तिला’ही पोलिसांनी शोधून काढले. गोंदिया जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबातील या युवतीचे लूक तिला नेपाळी नाव देऊन गेले. तिला मंगळवारी पोलिसांनी विचारपूस केली अन् तिने पुन्हा काही धक्कादायक खुलासे केले. चक्रावून सोडणाऱ्या या खुलाशांचे ठळक स्वरूप असे आहे.
ड्रग्जची लावली जाते लत
ती स्वता ड्रग एडिक्ट असल्याचे उजेडात आले. तिच्यासारख्या अनेक मुली, तरुणी गरिबीवर मात करण्यासाठी या टोळ्यांच्या नेटवर्कमध्ये सक्रीय असल्याचे उघड झाले. त्यांना कॅटरिंग किंवा ईव्हेन्ट मॅनेजमेंटच्या नावाखाली बाहेर प्रांतात नेले जाते. त्यांना ड्रग्जची लत लावली जाते.
बेमालूमपणे तस्करी
ड्रग्जची लत लागल्याने त्या काहीही करायला तयार होतात. परत येताना त्यांच्या बॅगमध्ये गांजा, अफिमसारखे अंमली पदार्थ टाकून त्यांच्याकडून बेमालूमपणे तस्करी करवून घेतली जाते. हे करतानाच त्यांच्या संपर्कातील मैत्रीणींनाही ड्रग्ज तस्कर आपल्या नेटवर्कमध्ये ओढतात.
सेक्स वर्कर म्हणूनही वापर
नशेची लत लागल्यानंतर त्याची पूर्तता करण्यासाठी, चांगले रहन सहन ठेवण्यासाठी त्यांना अधिक पैशाचे आमिष दाखवून सेक्स रॅकेटमध्येही ओढले जाते. अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा सेक्स वर्कर म्हणूनही वापर केला जातो.
---