अधिवेशनाचा वार्षिक ‘फार्स’ बंद करा; आशिष देशमुख यांचा सरकारला घरचा अहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 10:02 AM2017-12-15T10:02:02+5:302017-12-15T10:02:31+5:30
आॅनलाईन लोकमत
नागपूर : नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत नाना पटोले यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर आता आ.आशिष देशमुख यांनी शासनाला ‘टार्गेट’ करणे सुरू केले आहे. वेगळ्या विदर्भावरून मुख्यमंत्र्यांना रोखठोक पत्र पाठविल्यानंतर देशमुख यांनी हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीवरून दुसरा ‘लेटरबॉम्ब’ टाकला आहे. नागपूर कराराचा सन्मान करत हिवाळी अधिवेशन सहा आठवड्यांचे करावे. अन्यथा नागपूर अधिवेशनाचा वार्षिक ‘फार्स’ तरी बंद करावा, अशी मागणी त्यांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे.विदर्भ महाराष्ट्रात विलीन होण्यापूर्वी नागपूर ही मध्यप्रांताची राजधानी होती. राजधानी मुंबई होणार असल्यामुळे इकडचे प्रश्न सोडवण्यात अडचणी येतील हे ओळखून तत्कालीन नेत्यांनी नागपूर करार केला. त्यानुसार हे अधिवेशन सुरू झाले आहे. परंतु या अधिवेशनात विदर्भाचे प्रश्न सुटत नाहीत. विदर्भाच्या विकासासाठी भाजपची असलेली प्रतिबद्धता सिद्ध करण्यासाठी आणि या प्रदेशाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी हे अधिवेशन किमान सहा आठवडे चालविण्यात यावे.
मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार घ्यावा
सभागृहातील गोंधळ आणि सभागृहाबाहेरचे मोर्चे यातून जनतेचे मूळ प्रश्न सुटत नाहीत. जर सभागृह दीड महिना चालले तर नक्कीच विदर्भाच्या हिताचे निर्णय होतील. दीर्घकाळ अधिवेशन चालणे विदर्भाच्या हिताचे आहे, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील जाणतात. त्यामुळे त्यांनीच यासंदर्भात पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा आशिष देशमुख यांनी व्यक्त केली आहे.