काँग्रेसची किटकिट बंद करा
By admin | Published: February 18, 2017 02:46 AM2017-02-18T02:46:36+5:302017-02-18T02:46:36+5:30
काँग्रेसने आजवर दलित, मुस्लिमांना भाजपाची भीती दाखवून मते घेतली. या निवडणुकीमध्ये पुन्हा काँग्रेसचे तेच घिसेपिटे उमेदवार उभे आहेत.
नितीन गडकरी : तब्बल १० सभांचा झंझावात
नागपूर : काँग्रेसने आजवर दलित, मुस्लिमांना भाजपाची भीती दाखवून मते घेतली. या निवडणुकीमध्ये पुन्हा काँग्रेसचे तेच घिसेपिटे उमेदवार उभे आहेत. ते पुन्हा धर्मांधता, जातीयवादाची टेप वाजवतील. मतदानाच्या माध्यमातून त्यांची ही किटकिट कायमची संपवा, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
गडकरी यांनी शुक्रवारी तब्बल १० सभा घेत प्रचाराचा झंझावात केला. अत्रे ले-आऊट, मुंजे चौक, चोपडे लॉन, हिल टॉप, कपिलनगर चौक, जनता चौक, वैशाली नगर, शांतिनगर, अंबेनगर येथील सभांमध्ये गडकरी यांनी गेल्या अडीच वर्षात केंद्र व राज्य सरकारने नागपूरसाठी केलेल्या कामाचा आलेख मांडला. या सभांना भाजपाचे आमदार व पदाधिकारी उपस्थित होते. गडकरी म्हणाले, गेली १५ वर्र्षे आम्ही केवळ मिहानचे नावच ऐकत होतो. परंतु आम्ही सत्तेवर येताच मिहानला गती मिळाली. उद्योग आणले. नऊ हजार लोकांना रोजगार मिळाला असून पाच वर्षात हा आकडा ५० हजारावर जाईल.
नागपूर शहराला स्मार्ट शहर बनवण्याच्या दिशेने कामे सुरू आहेत. नऊ हजार कोटी रुपयांच्या मेट्रो रेल्वेचे काम सुरू आहे. बुटीबोरी येथे लवकरच १८ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प येणार आहे. मिहानमध्ये १० हजार युवकांना रोजगार दिला आहे. येत्या दोन महिन्यात इलेक्ट्रिकवर ४०० टॅक्सी शहरात धावतील. बायो डिझेलवर चालणाऱ्या बसेस सुरू झाल्या आहेत.
नागपुरातील ५० हजार गरिबांना स्वस्तात घरे उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासचा कारभार हा भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शी असायला हवा. त्यामुळे कामासाठी पैसे मागणाऱ्याला चोप द्या, असे आवाहनही त्यांनी केले. (प्रतिनिधी)
सिमेंट रस्ते २०० वर्षांसाठी खड्डेमुक्त
शहरात दोन हजार कोटी रुपयांचे सिमेंट रोडचे काम सुरू आहे. अतिशय चांगल्या दर्जाचे हे काम होत असून २०० वर्षे या रोडला खड्डे पडणार नाही, असा दावा गडकरी यांनी केला.
७५ ते ८० टक्के मतदान व्हावे
सध्या मोबाईलचा जमाना आहे. कुणी मतदान केले कुणी नाही, याची लगेच माहिती मिळते. त्यामुळे जास्तीतजास्त मतदान व्हावे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. तेव्हा या निवडणुकीमध्ये किमान ७० ते ८० टक्के मतदान व्हावे, असा प्रयत्न करा, असे आवाहनही त्यांनी केले.
पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर नेम
लकवाछाप मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील सर्व विकास कामे बंद पाडली होती. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला कधीच मिळाला नाही, अशी टीका करीत गडकरी यांनी पुन्हा एकदा कुणाचेही नाव न घेता काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर नेम साधला.