सॅनिटायझेशनचा कागदोपत्री सोपस्कार बंद करा : महापौर संदीप जोशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 11:17 PM2020-04-01T23:17:51+5:302020-04-01T23:19:10+5:30
कोणत्याही लोकप्रतिनिधीला विश्वासात न घेता सर्वत्र थातूरमातूर फॉगिंग आणि सॅनिटायझेशन केले जात आहे. हा कागदोपत्री सोपस्कार तात्काळ बंद करा, अशा शब्दात महापौर संदीप जोशी यांनी प्रशासनाला खडसावले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता सर्वत्र फवारणी होणे आवश्यक आहे. प्रशासनाकडून दररोजच फवारणीची प्रसिद्धी केली जाते. मात्र रोजच लोकप्रतिनिधींना नागरिकांकडून फवारणीबाबत तक्रारी केल्या जातात. शहरातील अनेक भागात अद्यापही योग्य प्रकारे फॉगिंग आणि सॅनिटायझेशन करण्यात आलेले नाही. अशा स्थितीत प्रशासनाद्वारे दररोज फॉगिंग आणि सॅनिटायझेशनचा दावा केला जात आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधीला विश्वासात न घेता सर्वत्र थातूरमातूर फॉगिंग आणि सॅनिटायझेशन केले जात आहे. हा कागदोपत्री सोपस्कार तात्काळ बंद करा, अशा शब्दात महापौरसंदीप जोशी यांनी प्रशासनाला खडसावले.
यासंबंधी संदीप जोशी यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांना नुकतेच एक कार्यालयीन पत्र सोपविले आहे. या पत्रात नमूद केल्यानुसार, शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रत्येक भागात सॅनिटायझेशन तसेच डासांच्या वाढत्या संख्येमुळे नियमित फॉगिंग करण्यात यावी. याकरिता मागील सात दिवसांपूर्वीच मनपा प्रशासनाला निर्देश देण्यात आले होते. मात्र याबाबत आवश्यक तशी कार्यवाही करण्यात आली नाही, असा प्रश्न संदीप जोशी यांनी या पत्रात उपस्थित केला आहे.
फॉगिंग आणि सॅनिटायझेशनचे महत्त्व लक्षात घेऊन कठोर निर्णय गरजेचे आहेत. मात्र महापौर वा स्थायी समिती अध्यक्ष यांना विश्वासात न घेता आयुक्त स्वत: निर्णय घेत आहेत. नगरसेवकांना विश्वासात न घेता काहीतरी करायचे या उद्देशाने केवळ कागदोपत्री सोपस्कार करीत असल्याचे पत्रात नमूद केले आहे.
नगरसेवकांच्या मागणीनुसार सॅनिटायझेशन
सॅनिटायझेशन करण्यासाठी मुख्यालयातून अग्निशमन विभागाच्या गाड्या पाठविल्या जातात. झोन स्तरावर अधिकारी व नगरसेवक याचे नियोजन करतात. त्यानुसार सॅनिटायझेशन वा फॉगिंग केले जाते. याचे श्रेय घेण्याची चढाओढ काही नगरसेवकांमध्ये दिसून येत आहे. हा प्रसंग पुढाकार घेण्याचा आहे, श्रेय घेण्याचा नसल्याची चर्चा आहे.