जिल्ह्यातील शाळा बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:10 AM2021-02-23T04:10:07+5:302021-02-23T04:10:07+5:30
नागपूर : कोरोनाचे संक्रमण ज्या शाळेत झाले आहे, त्या शाळा पुढील काही दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. तर विद्यार्थी ...
नागपूर : कोरोनाचे संक्रमण ज्या शाळेत झाले आहे, त्या शाळा पुढील काही दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. तर विद्यार्थी संक्रमित होत असल्याने जिल्ह्यातील शाळाच बंद करा, अशी भूमिका जि.प.च्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना भेटून मागणी करण्यात येणार आहे.
शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जवळपास ३५ विद्यार्थ्यांसह ४ शिक्षकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामध्ये सावनेर तालुक्यातील पाटणसावंगीसह इतर गावे तसेच रामटेक, नरखेड व कामठी आदी तालुक्याच्या शाळातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सद्यस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये ज्या शाळेतील विद्यार्थी कोरोनाबाधित झाले, अशा शाळा पुढील काही दिवसांकरिता बंद करण्यात आल्या आहेत, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) चिंतामण वंजारी यांनी सांगितले.
शाळांमध्ये कोरोनाचे संक्रमण झाल्याने जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली आहे. पुढील काही दिवस जिल्ह्यातील शाळाच बंद ठेवण्यात याव्यात, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांची आहे.
- सोमवारला आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना इयत्ता ५ ते ८ वीचे वर्ग बंद करण्याची मागणी करणार आहोत.
मनोहर कुंभारे, उपाध्यक्ष, जि.प. नागपूर
- जिल्ह्यातील आठ शाळा बंद
जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या सभापती भारती पाटील म्हणाल्या, जिल्ह्यात पाटणसावंगी आणि रामटेक येथील प्रत्येकी एक अशा एकूण दोन शाळांमधील विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात एकूण ३५ विद्यार्थ्यांचा आणि ४ शिक्षकांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या दोन शाळा तसेच या शाळांच्या आसपासच्या परिसरातील सहा अशा एकूण आठ शाळा तात्पुरत्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.