नागपुरातील हॉटेल्ससह १४ इमारतींचा वीज व पाणीपुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 08:58 PM2018-03-22T20:58:01+5:302018-03-22T20:58:22+5:30
उपराजधानीतील अनेक हॉटेल्स, बार व इमारती या धोकादायक असल्याची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून सुरूअसलेल्या निरीक्षणात पुढे आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीतील अनेक हॉटेल्स, बार व इमारती या धोकादायक असल्याची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून सुरूअसलेल्या निरीक्षणात पुढे आली आहे. आतापर्यंत १६१३ इमारतींचे निरीक्षण करण्यात आले आहे. यापैकी ५५३ इमारती धोकादायक असून, ५८६ इमारतींमधील वीज व पाणीपुरवठा खंंडित करण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्या आहे. यातील १४ हॉटेल्स , बारचा पाणी वा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे हॉटेल व्यावसायिकात खळबळ उडाली आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने १५ मीटरपेक्षा उंच असलेल्या इमारतींमध्ये अग्निशमन उपाययोजना असणे बंधनकारक आहे. अशी अग्निशमन यंत्रणा नसलेल्या इमारती धोकादायक आहेत. धक्कादायक बाब म्हणजे धोकादायक इमारतीत शाळा, महाविद्यालय आणि रुग्णालयांचाही समावेश आहे. अशा धोकादायक इमारतींमध्ये आग लागल्यास येथील लोकांचा जीवही धोक्यात येऊ शकतो, अशी शक्यता अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना न करता व्यवसाय करणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचाच हा प्रकार आहे. नोटीस बजावण्यात आलेल्यापैकी ४५ इमारतधारकांनी आग नियंत्रक उपाययोजना केलेल्या आहे.
स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. शहराची लोकसंख्या ३५ लाख आहे. शहरालगतच्या भागातही मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. विकासासोबतच शहरालगत मोठे उद्योग उभे राहात असल्याने या भागातील लोकसंख्याही वाढत आहे. उभ्या राहात असलेल्या नवीन इमारती प्रामुख्याने १५ मीटरहून अधिक उंचीच्या वा बहुमजली आहेत. अशा इमारतींना अग्निसुरक्षा अधिनियमानुसार अग्निशमन उपाययोजना बंधनकारक आहे. परंतु अनेक विकासक वा बिल्डर्सने पळवाटा शोधत ही यंत्रणा इमारतींमध्ये बसविलेली नाही. त्यामुळे मोठी आग लागल्यास इथल्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. शहरात अशा ५५३ इमारती धोकादायक असल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाºयांनी दिली.
वीज, पाणीपुरवठा बंद केलेले हॉटेल्स व इमारती
हॉटेल गोमती (पारडी), हॉटेल साहिद लॉजिंग व बोर्डींग (मोमीनपुरा),हॉटेल पाराडीस (सीए रोड), विश्रांती लॉज, हॉटेल कॉम्प्लेक्स (सीएरोड), नाफिस गेस्ट हाऊ स (मोमीनपुरा),हॉटेल अली मुस्तकीम (मोमीनपुरा), ताजश्री लॉजिंग व बोर्डींग (हंसापुरी), अलीया कॉम्प्लेक्स (गांधीबाग),सम्राट गेस्ट हाऊ स (सीए रोड ),विमल मोती निवास (टिमकी), सेव्हन सूट रुम अॅन्ड रेस्टारंट (अभ्यंकरनगर),एस.आर.कॅफे अॅन्ड स्मोकिंग (अभ्यंकरनगर),अमरजित रिसोर्ट प्रा.लि. एअरपोर्ट सेंटर पॉर्इंट (वर्धा रोड)